देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, बीसीसीआयने शुक्रवारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकलेली आहे. प्रत्येक दिवशी भारतामधील महत्वाच्या शहरांत लोकांना करोनाची लागण होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने हे पाऊल उचललं आहे. खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचं म्हणत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

“सध्याच्या घडीला स्पर्धा पुढे ढकलणं हा एकमेव पर्याय योग्य होता, कारण खेळाडूंनी सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही स्पर्धा पुढे ढकलली आहे. येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतायत त्यावरुन स्पर्धेचं भवितव्य ठरेल, आता काही बोलणं योग्य ठरणार नाही”, सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली.

अवश्य वाचा – ६०० हून अधिक नोकऱ्या, हजारो कोटींचा तोटा?? करोनामुळे बीसीसीआयवर आर्थिक संकट

खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन-डे मालिकाही रद्द केली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, बीसीसीआयने हा निर्णय घेतला. आगामी काळात ही मालिका पुन्हा खेळवली जाईल. आयपीएलचे संघ या निर्णयावर खुश आहेत का असा प्रश्न विचारला असता गांगुलीने कोणाकडे दुसरा पर्यायच नसल्याचं सांगितलं. सध्या देशात ८० लोकांना करोनाची लागण झालेली आहे.