भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला तसा नेहमीच्याच आक्रमक पद्धतीने प्रारंभ होणार होता. वाक्युद्धानिशी वातावरणात रंगही भरले गेले. परंतु फिलिप ह्युजचा मैदानावर उसळता चेंडू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मालिकेला भावनिक किनार लाभली. कणखर मनोवृत्तीचा लढाऊ ऑस्ट्रेलियन संघ या घटनेमुळे पुरता खचला. पण आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या घटनेतून सावरत पॅड बांधून सज्ज झाले आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना उभय संघांतील अस्सल थरार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचल्यावर गेले दोन आठवडे भारतीय संघासाठी ह्युज मृत्यूच्या भावनिक छायेत आणि कसून सरावात गेले. आता प्रत्यक्ष मैदानावरील युद्धासाठी शंख फुंकण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनी अद्याप उजव्या अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे भारतीय आघाडीच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहली सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सेनापती मायकेल क्लार्क पहिल्या कसोटीत खेळणार आहे, परंतु मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खेळण्याबाबत मात्र अनिश्चितता आहे.
२०११-१२मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने ०-४ अशा पद्धतीने मालिकेत पाटी कोरी ठेवली होती. परंतु त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची खूणगाठ भारतीय संघाने बांधली आहे.
अ‍ॅडलेड हे ह्युजचे सध्याचे निवासस्थान. त्यामुळे या सामन्याला भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ह्युजच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि साउथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने काही योजना आखल्या आहेत. सिडनी येथे शेफिल्ड शील्डच्या सामन्यात २५ नोव्हेंबरला ह्युजच्या डोक्याला उसळता चेंडू लागल्याने त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे मग दोन दिवसांनी त्याची प्राणज्योत मालवली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी आणि देशातील जनतेसाठी गेले काही दिवस आव्हानात्मक असेच होते.
या कठीण परिस्थितीत क्रिकेटला मागे टाकून संघातील खेळाडूंच्या पाठीशी समर्थ उभे राहण्याचा पवित्रा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) त्यांना साथ दिली. ४ डिसेंबरला सुरू होणारी ब्रिस्बेनची पहिली कसोटी आता १७ डिसेंबरला पुढे ढकलण्यात आली.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला दाखल झाला, तेव्हा क्लार्कच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. त्यामुळे पहिल्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होती. परंतु ह्युजच्या मृत्यूनंतर क्लार्कने आपल्या लाडक्या मित्राच्या कुटुंबीयांना, संघाला आणि खेळाडूंना धीराने सावरले. आता तीन दिवस सराव सत्र आणि संघबांधणीचे प्रयोग करून ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या कसोटीसाठी सज्जतेचे ऐलान केले आहे.
यंदाच्या हंगामात प्रथमच भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळणार नाही. परदेशातील भारताच्या धिम्या वाटचालीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु युवा खेळाडू पावलागणिक अनुभव मिळवत आहेत. आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तिन्ही परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघातील फार कमी खेळाडूंना या देशांमध्ये खेळण्याचा अनुभव गाठीशी होता. ऑस्ट्रेलिया दौरा त्या तुलनेत वेगळा मानला जातो.

ऑस्ट्रेलियाच्या संघात ह्य़ुज १३वा खेळाडू
अ‍ॅडलेड : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या १३ जणांच्या संघात फिलिप ह्य़ुजचा समावेश करून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला आदरांजली वाहिली आहे. ह्य़ुजच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी त्याची कसोटीतील ४२८ क्रमांकाची टोपी ऑस्ट्रेलिया संघातील सर्व खेळाडू परिधान करणार अाहेत. ह्य़ुजवर आधारित एक ध्वनी-चित्रफितही अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. नाबाद ६३ धावांवर खेळत असताना ह्य़ुजचा चेंडू लागून मृत्यू झाल्यामुळे एक मिनिटाऐवजी ६३ सेकंदांचे मौन बाळगण्याची विनंती खेळाडू आणि चाहत्यांना करण्यात आली आहे. क्रीडा लेखक अ‍ॅडम बर्नेट याने लिहिलेल्या कवितेचे वाचन ऑस्ट्रेलियातील अभिनेता जॅक थॉम्पसन करणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज
अ‍ॅडलेड ओव्हलची खेळपट्टी प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. याचप्रमाणे फलंदाजांना धावा काढण्यासाठी नंदनवन असेल. कालांतराने ती फिरकी गोलंदाजांनाही साथ देईल. त्यामुळे सामन्याच्या उत्तरार्धात खेळपट्टीबाबत अनिश्चितता असेल.

प्रतिस्पधी संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, वरुण आरोन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, लोकेश राहुल, नमन ओझा, महेंद्रसिंग धोनी.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), मिचेल जॉन्सन, रयान हॅरिस, पीटर सिडल, नॅथन लिऑन, १२वा खेळाडू : जोश हॅझलवूड, १३वा खेळाडू : फिलिप ह्य़ुज.
सामन्याची वेळ : सकाळी ५.३० वा. पासून.

ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळावे! -पाँटिंग
अ‍ॅडलेड : सहकारी फिलिप ह्य़ुज हा उसळत्या चेंडूचा बळी ठरला, ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. आमच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध आक्रमक खेळ करावा, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सहकाऱ्यांना दिला आहे. पाँटिंग म्हणाला, ‘‘सामन्यातील पहिला चेंडू मिचेल जॉन्सनने उसळता टाकल्यास मला जास्त आनंद होईल. प्रतिस्पर्धी खेळाडूंना जखमी करावे असा माझा हेतू नाही, मात्र उसळता चेंडू टाकणे हा खेळाचा एक अविभाज्य घटक आहे. जर आमच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारले नाही तर त्यांना घरच्या मैदानावर वर्चस्व गाजविता येणार नाही. घरच्या खेळपट्टीवर आमच्या संघास पराभूत करणे ही अतिशय अवघड कामगिरी असते.’’

फिलिप ह्य़ुजच्या मृत्यूमुळे सर्व जण दु:खात असले तरी आम्ही गोलंदाजीतील आक्रमकपणा कमी करणार नाहीत. यापुढेही ऑस्ट्रेलियाची धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. गेले १८ महिने मी आक्रमक गोलंदाजी करत असून त्यात कोणताही बदल होणार नाही. माझ्या गोलंदाजीने अद्याप कोणताही फलंदाज घायाळ झालेला नाही, त्यामुळे त्या वेळी कसे वाटते, याची मला कल्पना नाही. ऑस्ट्रेलिया संघ ह्य़ुजला श्रद्धांजली वाहणार असून ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. ह्य़ुजची कसोटीतील टोपी परिधान करणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कसोटीतील पहिले सत्र आमच्यासाठी कठीण जाणार असून आम्ही मानसिकदृष्टय़ा स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहोत.
मिचेल जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज

कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणे, हा माझ्या कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण आहे. मायदेशातील गेल्या मालिकेतही मी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे खेळाडूंशी समन्वय कसा साधावा, याची जाणीव मला आहे. मैदानावर मला काय हवे आहे, यासाठी खेळाडूंकडून पाठिंबा मिळत असल्यामुळे माझ्यावरील दडपण कमी झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही आक्रमक खेळ करण्याचा निर्धार केला आहे. मी कायमच आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्णधारपदाच्या भूमिकेतही माझ्याकडून आक्रमकपणाच पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव असल्यामुळे चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावा, हीच अपेक्षा आहे.
– विराट कोहली, भारताचा हंगामी कर्णधार.