भारत-द. आफ्रिका ‘अ’ क्रिकेट मालिका

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यास सोमवारपासून प्रारंभ होत असून, सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या शुभमन गिलला निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.

चारदिवसीय दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात गिल आणि दुसऱ्या सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा नेतृत्व करणार आहे. दोन्ही सामन्यांसाठी भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम समन्यवय साधण्यात आला आहे.

पहिल्या सामन्यात कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू के. गौतम आणि आंध्र प्रदेशचा यष्टीरक्षक के. एस. भरत खेळणार आहेत. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना भरतने आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षणाने उपयुक्तता सिद्ध केली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान दिले जात आहे. या परिस्थितीत पंतला विश्रांती दिल्यास भरतचा पर्याय उपलब्ध होईल. याचप्रमाणे साहासुद्धा पुन्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे.

अष्टपैलू विजय शंकर आणि शिवम दुबे यांना दोन्ही सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. तमिळनाडूच्या विजयला दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अध्र्यावर सोडावी लागली होती. शिवमने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही आपली छाप पाडली होती. झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे.

एडीन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघातही अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. आफ्रिकेच्या कसोटी संघाचा भाग असलेल्या लुंगी एन्गिडीला या सामन्यांमुळे उत्तम सरावाची संधी मिळू शकेल. विश्वचषक स्पर्धेत त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता.