वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारताच्या अभियानाला गुरुवारपासून प्रारंभ करताना वेस्ट इंडिजविरुद्ध परिपूर्ण समन्वयासह विजयी सुरुवात करण्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीने केला आहे.

भारताच्या फलंदाजीच्या फळीत कोहली, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या तुलनेत ही फलंदाजीची फळी अधिक भक्कम आहे.

वर्षांच्या पूर्वार्धात इंग्लंडला कॅरेबियन बेटांवरील कसोटी मालिकेचे आव्हान जड गेले होते. वेस्ट इंडिजने इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे अँटिग्वातील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवरील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या मैदानावर विंडीजने इंग्लंडला दोन डावांत अनुक्रमे १८७ आणि १३२ धावांत गुंडाळून १० गडी राखून विजय मिळवला होता.

होल्डरसह केमार रोच आणि शेनॉन गॅब्रिएल या वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना करण्यासाठी कोहली आणि मुख्य प्रशिक्षकपदावर फेरनिवड झालेल्या रवी शास्त्री यांना रणनीती आखावी लागणार आहे.

चार की पाच गोलंदाज?

खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असेल, तर भारतीय संघ चार विशेषज्ञ गोलंदाजांसह खेळेल. जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. त्यामुळे एकमेव फिरकी गोलंदाजाच्या स्थानासाठी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यात तीव्र स्पर्धा असेल. खेळपट्टीचे हिरवेगार स्वरूप पाहता कोहलीकडे पाच गोलंदाजांसह खेळण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या परिस्थितीत अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात स्थान मिळवेल आणि रहाणे किंवा रोहित यापैकी एक जण संघात असेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

’  सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

’  थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ (इंग्रजी), सोनी टेन ३ (हिंदी)

ब्राव्हो, कॉर्नवॉल लक्ष वेधणार?

वेस्ट इंडिजच्या संघात डॅरेन ब्राव्हो हा सर्वात अनुभवी फलंदाज असून, त्याने ५२ कसोटी सामन्यांत ३४५९ धावा केल्या आहेत. ३८ धावसरासरी राखणाऱ्या ब्राव्होच्या खात्यावर आठ शतके जमा आहेत. मात्र सर्वाचे लक्ष जागतिक क्रिकेटमधील वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रहकीम कॉर्नवॉलकडे असणार आहे. मधल्या फळीतील फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी ही त्याची वैशिष्टय़े आहेत.

चेसचे आव्हान

२०१६मध्ये रोस्टन चेसने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पाचवा दिवस खेळून काढत  विंडीजचा डावाचा पराभव टाळला होता. त्याने नाबाद १३७ धावांची झुंजार खेळी साकारत भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले होते. चेसने ऑफ-स्पिन गोलंदाजीनिशी ५० कसोटी बळीसुद्धा मिळवले आहेत. वेस्ट इंडिजकडे कसोटी क्रिकेटसाठी अनुकूल शाय होप, जॉन कॅम्पबेल आणि शिम्रॉन हेटमायर हे गुणी युवा खेळाडू आहेत.

सलामीसाठी तीन पर्याय

फलंदाजीचा समन्वय ही भारतीय संघाची प्रमुख डोकेदुखी झाली आहे. सलामीच्या एका स्थानासाठी मयांक अगरवाल निश्चित असला तरी दुसऱ्या स्थानाचा प्रश्न कायम आहे. विशेषज्ञ सलामीवीर लोकेश राहुलचे पारडे जड असले तरी हनुमा विहारीचा भक्कम पर्याय उपलब्ध आहे. हार्दिक पंडय़ा या सामन्यासाठी उपलब्ध असल्यास अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यापैकी एक जण संघाबाहेर जाईल. परंतु गेल्या काही वर्षांतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांचा आढावा घेतल्यास भारतीय संघ अतिरिक्त फलंदाजासह खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजिंक्य आणि रोहित या दोघांनाही संघात स्थान मिळू शकेल.

२७ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक २७ कसोटी विजय साकारले आहेत. कर्णधार विराट कोहलीला (२६ विजय) विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयासह या विक्रमाची बरोबरी साधता येईल.

१८ कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या (२५ शतके) नावावर आहे. या यादीत रिकी पाँटिंग १९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आणखी एक शतक साकारल्यास तो पॉटिंगची बरोबरी करू शकेल.

कसोटी क्रिकेट संपत चालल्याचे भाष्य काही मंडळी करीत आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने यातील स्पर्धात्मकता आणि आव्हानात्मकता वाढली आहे. परंतु माझा दृष्टिकोन तसा नाही. हे पाऊल योग्य वेळी उचललेले आहे.

-विराट कोहली, भारताचा कर्णधार