महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले, तर बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरी गाठत एक पदक निश्चित केले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके मिळाली. म्हणजेच पदकांच्या बाबतीत भारताने रिओलाही मागे टाकले आहे.

पी. व्ही. सिंधूने चीनच्या बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. सिंधू मात्र रौप्यचे सुवर्णपदकामध्ये रूपांतर करू शकली नाही. १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताच्या महिला खेळाडूंनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही तीन भारतीय महिला खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली नव्हती.

१०४ वर्षांची प्रतीक्षा

भारतीय महिला खेळाडूंना पहिल्या पदकासाठी १०४ वर्षे वाट पाहावी लागली. ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरू झाले. २००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिला वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले. मात्र, यानंतर महिला खेळाडूंना २००४ आणि २००८च्या ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकता आली नाहीत.

हेही वाचा – Tokyo 2020 : शाब्बास..! बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रथमच दोन भारतीय महिला खेळाडूंनी पदके जिंकली. सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये आणि बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने कांस्यपदक जिंकले. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने रौप्य आणि महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य जिंकले. रिओमध्ये कोणताही पुरुष खेळाडू पदक जिंकू शकला नाही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

भारतीय महिला खेळाडूंनी अद्याप ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकलेले नाही. अशा स्थितीत या वेळी प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते. लव्हलिना व्यतिरिक्त विनेश फोगाट कुस्तीमध्ये सुवर्ण जिंकू शकते.