भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका

धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे पूर्णपणे वाया गेल्यावर आता बुधवारी रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला पावसाबरोबरच युवा फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीची चिंता असणार आहे. या सामन्याद्वारे मायदेशात आफ्रिकेविरुद्ध पहिला ट्वेन्टी-२० विजय मिळवण्यासाठीही भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.

२१ वर्षीय पंतला एखाद-दुसरा सामना वगळता कोणत्याही क्रिकेट प्रकारात सातत्य बाळगता आलेले नाही. त्याशिवाय नुकताच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही मालिकेतील ८ सामन्यांत मिळून त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला त्याच्या फटक्यांच्या निवडीवर गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीला कधीही संघात स्थान उपलब्ध असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितल्याने पंतवरील दडपणात अधिक भर पडली आहे.

भारताने घरच्या चाहत्यांसमोर आफ्रिकेविरुद्ध एकही ट्वेन्टी-२० सामना जिंकलेला नाही. यापूर्वी २०१५मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताला अनुक्रमे सात आणि पाच गडय़ांनी पराभव पत्करावा लागला होता. परंतु मोहालीचा इतिहास भारताच्या बाजूने आहे. येथे झालेले दोन सामने भारताने जिंकले आहेत. कोहलीने २०१६मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५१ चेंडूंत ८२ धावा फटकावून भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचवले होते. काही दिवसांपूर्वीच्या एका ‘ट्वीट’मध्ये त्याने या खेळीचा उल्लेखही केला होता. त्याशिवाय सध्याचा भारतीय संघ आफ्रिकेच्या तुलनेत अधिक सक्षम असल्याने त्यांना यंदा आफ्रिकेविरुद्धची पराभवाची कोंडी फोडण्याची सुवर्णसंधी आहे.

युवा खेळाडूंवर भारताची भिस्त

फलंदाजीत भारताकडे कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी त्रिकुटाव्यतिरिक्त श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि हार्दिक पंडय़ा अशी युवा फळीही उपलब्ध आहे. तळापर्यंत फलंदाजी लांबवण्याच्या हेतूने भारताने कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल या फिरकी जोडीला या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पंडय़ा ही फिरकी जोडी कशी कामगिरी करते, हे पाहणे रंजक ठरेल. त्याचप्रमाणे राहुल आणि दीपक या चहर बंधूंपैकी किमान एकाचे तरी संघातील स्थान पक्के मानले जात आहे.

आफ्रिकेला डीकॉककडून आशा

दुसरीकडे नियमित कर्णधार फॅफ डय़ुप्लेसिसच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या क्विंटन डीकॉकवर आफ्रिकेची प्रामुख्याने मदार असून गोलंदाजीत कॅगिसो रबाडाच्या कामगिरीवर त्यांचे यश अवलंबून आहे.

चाहत्यांवर वरुणराजाची कृपा

पहिली लढत पावसामुळे वाया गेल्यावर निराश झालेल्या चाहत्यांवर वरुणराजाने कृपा केली आहे. दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट नसून संपूर्ण सामना होण्याची अधिक शक्यता असल्याचे पंजाब क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजिंदर गुप्ता यांनी सांगितले. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला येथील हवामान व दवाचा अधिक लाभ होऊ शकतो.

१४ भारत-दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत १४ ट्वेन्टी-२० सामने झाले असून भारताने आठ, तर आफ्रिकेने पाच सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

५३ चालू वर्षांत सर्वप्रकारच्या ट्वेन्टी-२० सामन्यांत मिळून १,००० धावा पूर्ण करण्यासाठी श्रेयस अय्यरला (९४७ धावा) फक्त ५३ धावांची आवश्यकता आहे. २०१९मध्ये ट्वेन्टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो अग्रस्थानी आहे.

९७ रोहित शर्माच्या कारकीर्दीतीलहा ९७वा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना आहे. फक्त महेंद्रसिंह धोनी (९८) रोहितच्यापुढे आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डीकॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक),

रासी व्हॅन डर डुसेन, तेम्बा बव्हुमा, ज्युनियर डाला, जोर्न फॉच्र्युन, ब्युरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅन्रिच नॉर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, जॉर्ज लिंडे.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि हिंदी १