भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळत आहे. या संघात दुखापतीमुळे हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पण दुखापतीतून तो हळूहळू सावरतो आहे. नुकताच दुखापतीतून बरा झालेला हार्दिक पांड्या भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो संघातून बराच काळ दूर आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघातही त्याचा समावेश नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात त्याने तंदुरूस्ती सिद्ध केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करताना हार्दिकने दमदार कामगिरी केली. त्याने मुंबईचा निम्मा संघ ८१ धावात तंबूत धाडला आणि आपण ‘फिट’ असल्याचे दाखवून दिले.
दुबईमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर आतापर्यंत हार्दिक कोणत्याही सामन्यात खेळला नव्हता. पण, तो आता पूर्णपणे फिट झाला आहे. वानखेडेवर सुरू असलेल्या सामन्यात त्याने १९ षटके फेकली आणि त्यात त्याने ५ बळी टिपले.
विशेष म्हणजे हार्दिकने तुलनेने सर्वाधिक षटके फेकली. या सामन्यात कर्णधार सिद्धेश लाड (१३०) आणि श्रेयस अय्यर (१७८) यांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४६५ धावा केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 4:46 pm