नवी दिल्ली : जागतिक कनिष्ठ स्पर्धेची माजी विजेती निखात झरीन (५१ किलो) आणि आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) यांच्यासह भारताच्या पाच खेळाडूंनी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली आहे.

आशीष कुमार (७५ किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन (५६ किलो) आणि ब्रिजेश यादव (८१ किलो) यांनीही अंतिम फेरीत स्थान मिळवले. आशीष याला उपांत्य फेरीत थायलंडच्या वुट्टीचाय मासूक याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

दीपक सिंगने भूतानच्या ताशी वांगडी याच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. दीपकचा ठोसा वांगडीच्या उजव्या डोळ्यावर बसल्याने पंचांनी दीपकच्या बाजूने निकाल दिला. निखातने थायलंडच्या जुटामास जिटपाँग हिच्यावर ४-१ असा विजय मिळवला. हुसामुद्दीनने अधिक आक्रमक खेळ केल्यामुळे त्याला थायलंडच्या अमरित याओडॅम याच्यावर ३-२ अशी सरशी साधता आली. आशीष कुमारने फनत खाखरामानोव्ह याला सहज हरवून आगेकूच केली.

महिलांमध्ये, मंजू राणी (४८ किलो) आणि भाग्यवती कचरी (८१ किलो) यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.