जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्हय़ात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. त्यात तीन भावांचा समावेश आहे. रविवारी या भागात उखळी तोफांचा मारा करण्यात आला. रविवारी सकाळी चार तास शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर बेछूट गोळीबार केला. गोळीबारात दोन बहिणीही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने जम्मूला नेण्यात आले. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्राणहानीबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, राज्यातील लोकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी देवेंदर आनंद यांनी सांगितले, की प्रत्यक्ष ताबारेषेवर मोठय़ा प्रमाणात बेछूट गोळीबार करण्यात आला. सकाळी पावणेआठ ते साडेअकरा वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता. भारतीय सैन्याने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले, की पाकिस्तानने पूँछ जिल्हय़ातील बालाकोट भागात तोफगोळय़ांचा मारा केल्याने त्यात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत. तर इतर दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चौधरी महंमद रमझान (३५) यांच्या मातीच्या घरावार तोफगोळे पडले. त्यात रमझान, त्यांची पत्नी मलिका बी (३२), मुलगे अब्दुल रेहमान (१४), महंमद रिझवान (१२) व रझाक रमझान (वय ७) असे पाच जण ठार झाले.