युरोपियन चषक विजेत्या बायर्न म्युनिकने या मोसमातील आपला जेतेपदांचा धडाका कायम राखत पाचव्या जेतेपदाची कमाई केली. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत बायर्न म्युनिकने राजा कासाब्लँका संघावर २-० अशी मात करत फिफा क्लब विश्वचषकावर मोहोर उमटवली.
मोरोक्कन चषक विजेत्या राजा कासाब्लँकाचे आव्हान पेलताना सुरुवातीला बायर्न म्युनिकच्या खेळाडूंना अडचणी जाणवत होत्या. पण ब्राझीलच्या डान्टे आणि थिआगो यांनी पहिल्या २२ मिनिटांच्या आत केलेल्या गोलांच्या बळावर बायर्न म्युनिकने जेतेपदावर कब्जा केला.
एका मोसमात चॅम्पियन्स लीग, बुंडेसलिगा, जर्मन चषक तसेच यूईएफए सुपर चषक जेतेपदानंतर आता फिफा क्लब विश्वचषक जिंकणारा बायर्न म्युनिक हा पहिला जर्मन संघ ठरला.
बायर्न म्युनिकचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांचे फिफा क्लब विश्वचषकाचे हे तिसरे जेतेपद ठरले. याआधी त्यांनी बार्सिलोनाला २००९ आणि २०११मध्ये हे जेतेपद मिळवून दिले होते. जर्मनीचा अव्वल खेळाडू बास्टियन श्वाईनस्टायगर आणि नेदरलँड्सचा आर्येन रॉबेन यांच्याशिवाय खेळताना बायर्न म्युनिकला जोरदार हल्ले चढवता आले नाहीत.
सातव्या मिनिटालाच बायर्न म्युनिकने आघाडी घेतली. जेरोम बोटेंगच्या साथीने डान्टेने राजा कासाब्लँकाचा बचाव भेदत गोल झळकावला आणि बायर्न म्युनिकला आघाडीवर आणले. २२व्या मिनिटाला डेव्हिड अलाबाने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि चेंडू थिआगोकडे सोपवला. कोणतीही चूक न करता
थिआगोने मारलेला फटका उजव्या बाजूने गोलजाळ्यात विसावला. या जेतेपदासह बायर्न म्युनिकने २०१४ मधील सर्व जेतेपद आपल्याकडे राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग स्पर्धेची बाद फेरीही गाठली आहे.