भारतामध्ये प्रो-कबड्डीमुळे कबड्डीला पुन्हा एकदा अच्छे दिन आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी वर्ष झालीयेत या स्पर्धेला. यंदा या स्पर्धेचा सहावा हंगाम सुरु आहे. मात्र पहिल्या ५ सत्रांमध्ये प्रो-कबड्डीला मिळालेला प्रतिसाद ( सहाव्या हंगामात प्रेक्षकांनी कबड्डीकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय) पाहून या देशातील क्रीडा प्रेमी नागरिकांना (खरंतर क्रिकेट प्रेमी नागरिकांना) आपल्या मातीच्या खेळाची आठवण झाली. एरवी कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या सामन्याचं थेट प्रेक्षपण कोणत्या क्रीडा वाहिनीवर झालेलं माझ्या ऐकिवात नाही, आणि झालं जरी असलं तरीही त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा वादाचा मुद्दा राहिलेला आहे. तर मुद्दा असा आहे, की प्रो-कबड्डीला मिळणारा प्रतिसाद पाहून राष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांचं प्रक्षेपणही क्रीडा वाहिन्यांवर जोमाने व्हायला सुरुवात झाली. कबड्डी हा भारताच्या मातीतला खेळ, जगाला या खेळाची ओळख आपण करुन दिली. आशियाई खेळांमध्ये आपण यातले अनभिषिक्त सम्राट होतो. मात्र २०१८ सालातील काही घडामोडींनी भारतीय कबड्डीला स्वतःच्या कारभाराबद्दल गांभीर्याने विचार करायला भाग पाडलं आहे.

२०१८ साली इंडोनेशियातील जकार्ता शहरात झालेल्या आशियाई खेळांमुळे यंदा प्रो-कबड्डीचं वेळापत्रक बदललं गेलं. ७ सुवर्णपदकांचा मानकरी असलेला भारतीय कबड्डी संघ यंदाही राजेशाही थाटात आशियाई खेळांसाठी उतरला होता. यामध्ये अनुप कुमारऐवजी अजय ठाकूरकडे देण्यात आलेलं नेतृत्व हे अनेकांच्या पचनी पडलं नव्हतं. अनुपचा खेळ खालावला असला तरीही त्याची संघावरची पकड अजुन मजबूत आहे. कोणत्या क्षणी काय डाव खेळायचा हे त्याला समजतं. प्रो-कबड्डीमध्ये दक्षिण कोरिया, इराण, बांगलादेश, केनिया यासारख्या देशांचे खेळाडू आता सहभागी होतात. महत्वाची गोष्ट म्हणजे इराण, दक्षिण कोरिया यासारखे देश आता भारताच्या तोडीचा खेळ करायला लागले आहेत. याचसोबत जपान, इंडोनेशिया, केनिया यासारख्या देशांनी दाखवलेला दमखमही वाखणण्याजोगा होता. पण आम्हाला कोण हरवणार या थाटात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला तो साखळी फेरीत कोरियाने दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे. यानंतर उपांत्य फेरीत इराणने भारतावर बाजी पलटवत भारताचं हक्काचं सुवर्णपदक हिसकावून घेतलं.

काही वर्षांपूर्वी उपांत्य फेरीत भारताचा सामना करावा लागू नये यासाठी साखळी फेरीत कमकुवत संघाकडून हार पत्करणारा इराण आता भारताला घाबरत नाहीये. तो आता रौप्य नाही तर सुवर्णपदकाच्या शर्यतीत उतरलाय. त्यामुळे यापुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा भारतावर मात करुन विजेतेपद मिळवण्याची तयारी इराणची असेल. मग हा बदल झाला कसा??? जादूची कांडी वगैरे फिरली की काय??? तर अजिबात नाही…काळानुरुप कबड्डी आता बदलत चालली आहे. पुर्वीच्या काळात मातीच्या मैदानावर खेळत असताना लढवले जाणारे डावपेच आता कामी येत नाहीत. प्रत्येक संघाने आपली स्वतःची एक वेगळी पद्धत निर्माण केली आहे. इराणचे खेळाडू हे अंगापिंडाने एखाद्या मल्लासारखे आहेत, अनेक इराणी खेळाडूंना कुस्तीतले अनेक डावपेच माहिती आहेत. त्यामुळे भक्कम बचाव ही आपली मोठी जमेची बाजू असल्याचं इराणने वेळेतच ओळखलं. याचाच वापर करत इराणने उपांत्य फेरीत भारताच्या सर्व चढाईपटूंवर हल्ले चढवत त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं. दुर्दैवाने सुरुवातीच्या सत्रात पिढाडीवर पडलेला भारत मग कमबॅक करुच शकला नाही आणि भारताने हक्काचं सुवर्णपदक गमावलं.

जे डावपेच मैदानात खेळले जातात तेच डावपेच आता मैदानाबाहेरही खेळले जातात. आशियाई स्पर्धांआधी आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाने दुबईत, कबड्डी मास्टर्स ही सहा निमंत्रीत देशांची स्पर्धा भरवली. या स्पर्धेत इराणने जाणून-बुजून आपला दुय्यम संघ मैदानात उतरवला. कारण त्यांच्यादृष्टीने आशियाई खेळ हे महत्वाचे होते. या स्पर्धेत भारताने इराणवर मात केली खरी, मात्र भारतीय संघाचे सर्व डावपेच हे इराणच्या प्रशिक्षकांना व खेळाडूंना लक्षात आले. कारण भारतीय कबड्डी महासंघाने दुबईतल्या स्पर्धेतली आपल्या मुख्य संघालाच मैदानात उतरवलं होतं. वास्तविक या स्पर्धेसाठी भारत आपल्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन नवोदितांना संधी देऊ शकला असता, मात्र एका व्यक्तीच्या हाताखाली गेलेला कबड्डी महासंघ इतका विचार करु शकतो का हाच प्रश्न आता निर्माण झालाय. जे इराणच्या बाबतीत तेच दक्षिण कोरिया, जपान यासारख्या देशांचंही आहे. या देशांचे खेळाडू हे ज्युडो-कराटेमध्ये निपूण असल्यामुळे ते सहज या खेळातील मूव्हज कबड्डीत वापरतात. टो-टच, बॅक किक सारख्या प्रकारांमध्ये कोरियन खेळाडूंचं कौशल्य पाहण्यासारखं होतं.

एकीकडे इतर देश आपली मोर्चेबांधणी करत असताना भारतीय संघ काय करत होता?? साहजिकपणे तो बेसावध होता. मात्र यासाठी संघाला दोष न देता मला भारतीय कबड्डी महासंघाला दोष द्यावासा वाटतो. धोरणामध्ये सुसुत्रता नसणं हे भारतीय कबड्डीला भोवलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेत भारताचे प्रशिक्षक बदलले जातात. एका स्पर्धेला २-३ प्रशिक्षकांची फौज पाठवण्यामागचं कारणचं कळत नाही. खेळाडूंच्या निवडीमध्ये असलेला हस्तक्षेप, पात्रता नसलेल्या खेळाडूंना संघात दिलेलं स्थान या सर्व गोष्टींमुळे कबड्डी महासंघ चांगलाच वादात सापडला. याचवेळ दिल्ली उच्च न्यायालयाने जनार्दनसिंह गेहलोत आणि डॉ. मृदुल भदोरिया यांची कबड्डी महासंघावरची एकाधिकारशाही मोडून काढत प्रशासकाची नेमणूक केली. आशियाई खेळांसाठी निवडण्यात आलेल्या संघनिवडीवर आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर, न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली सामना घेण्याचे आदेश दिले. अर्थात या सामन्याला भारताचा संघ उपस्थित राहिला नाही ही बाब वेगळी आहे, मात्र तुमच्या दैनंदिन कामांमध्ये जर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणार असेल तर ही परिस्थिती किती वाईट आहे याचा विचार कबड्डी महासंघ करणार आहे की नाही??

यंदाच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला कांस्यपदक मिळालं, पण हे कांस्यपदक नसून एक सुचना आहे. ती सुचना म्हणजे, की कबड्डीवर आता भारताचं राज्य राहणार नाही, कबड्डी आता ग्लोबल होतेय. कदाचीत पुढच्या स्पर्धांमध्ये भारत जोरदार कमबॅकही करेल, पण काळाची पावलं ओळखत जर आताच बदललो नाही तर आगामी काळात भारतीय कबड्डीला विचार करायलाही वेळ मिळणार नाही. बघूया, यंदाच्या वर्षात झालेल्या चुकांमधून कबड्डी महासंघ धडा घेतो का ते??