27 February 2021

News Flash

Flashback 2018 : युवाशक्तीची यशोगाथा!

भारतीय क्रीडाप्रेमींसाठी सरते वर्ष संस्मरणीय ठरले.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय क्रीडाप्रेमींसाठी सरते वर्ष संस्मरणीय ठरले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेले घवघवीत यश आणि नव्या ताऱ्यांचा उदय यामुळे भविष्यातील उज्ज्वल यशाची नांदी यावर्षी पाहायला मिळाली. नेमबाज मनू भाकर, सौरभ चौधरी, अ‍ॅथलीट हिमा दास, नीरज चोप्रा, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, बॅडमिंटनपटू समीर वर्मा, लक्ष्य सेन तसेच टेबलटेनिसपटू मनिका बात्रा यांसारख्या युवाशक्तीने भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले. त्याचबरोबर विराट कोहलीची सर्वोत्तम कामगिरी, हॉकीमध्ये भारताने घेतलेली झेप, वर्षअखेरीस सायना नेहवालसह तिरंदाज दीपिका कुमारीचा झालेला विवाह या यशोगाथेला महिला क्रिकेटमध्ये मिताली राज विरुद्ध हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात झालेल्या वादामुळे सरत्याशेवटी वादाची किनार लाभली.

क्रिकेट

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली भारताच्या युवा शिलेदारांनी न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरण्याची करामत केली. २०००, २००८, २०१२ नंतर भारताचे हे चौथे जगज्जेतेपद ठरले. विराट कोहलीच्या भारतीय संघाने मायदेशात रंगलेल्या अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतच सव्वाशेर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरताना श्रीलंकेतील निधास करंडकही आपल्या नावावर केला. भारताने अप्रतिम कामगिरी करत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान राखले तर ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली.

हॉकी

१९७५नंतर भारताला प्रथमच हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र भुवनेश्वर येथे घरच्या चाहत्यांसमोर खेळताना भारतीय पुरुष संघाने कामगिरीही उंचावली. मात्र नेदरलँड्सने उपांत्यपूर्व फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आणले. बेल्जियमने पेनल्टी शूट-आऊटपर्यंत रंगलेल्या महामुकाबल्यात नेदरलँड्सचा ३-२ असा पराभव करून हॉकी विश्वचषकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या तर राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणाऱ्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत झेप घेतली. महिला संघाने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

अ‍ॅथलेटिक्स

आतापर्यंत फारसे यश पदरी न पडलेल्या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे नीरज चोप्रा, हिमा दास यांनी दाखवून दिले. भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई स्पर्धेत ८८.०६ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदकासह नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धेतही ८६.४७ अशी कामगिरी नोंदवून त्याने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. हिमा दासने जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अशी किमया करणारी ती पहिली भारतीय अ‍ॅथलीट ठरली. आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत आणि वैयक्तिक ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.

टेबलटेनिस

यंदाचे वर्ष भारतासाठी आणि विशेष करून मनिका बात्रासाठी विशेष ठरले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत मनिकाने नवा इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने कांस्यपदक पटकावले. अचंता शरथ कमाल याने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. त्याचबरोबर भारताने राष्ट्रकुलमध्ये महिला सांघिक गटात सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य, मिश्र दुहेरीत कांस्य, पुरुष सांघिक गटात कांस्यपदक मिळवले.

नेमबाजी

युवा नेमबाज मनू भाकर हिचा दबदबा यावर्षी पाहायला मिळाला. १० मीटर एअर पिस्तूल या आपल्या आवडत्या प्रकारात मनू भाकरने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्णपदके तसेच राष्ट्रकुल स्पर्धा आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. युवा नेमबाज सौरभ चौधरी यानेही आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर आशियाई स्पर्धा, युवा ऑलिम्पिक तसेच आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. हिना सिधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले.

बॅडमिंटन

तब्बल सात प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर वर्षअखेरीस पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जेतेपदांचा दुष्काळ संपवला. राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवाल आणि सिंधू यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत सायनाने बाजी मारत सुवर्णपदक प्राप्त केले. समीर वर्माने यावर्षी स्विस, रशियन, हैदराबाद आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय या चार जागतिक स्पर्धाची जेतेपदे पटकावली. सायना नेहवाल आपला मित्र आणि सहकारी पारूपल्ली कश्यप याच्याशी विवाहबंधनात अडकली. लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य, जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, आशियाई कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण, टाटा खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली.

बॉक्सिंग

नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताची छोटय़ा चणीची बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली. सहा जागतिक सुवर्णपदके पटकावणारी मेरी कोम ही जगातील पहिली महिला बॉक्सर ठरली आहे. इतकेच नव्हे तर या कामगिरीसह मेरी कोमने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावरही नाव कोरले. आशियाई स्पर्धेत बॉक्सर्सनी भारताला पाच सुवर्णपदकांसह १० पदके मिळवून दिली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कास्यपदकांसह नऊ पदके पटकावली.

कुस्ती

महाराष्ट्राच्या राहुल आवारे याने राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावले. मात्र चांगल्या कामगिरीनंतरही त्याला आशियाई स्पर्धेसाठी वगळण्यात आले. राष्ट्रकुलमध्ये कुस्तीगारांनी पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि ४ कांस्यपदके जिंकली. आशियाई स्पर्धेत मात्र बजरंग पुनिया, विनेश फोगट यांच्या सुवर्णपदकावरच भारताला समाधान मानावे लागले.

टेनिस

सानिया मिर्झाने बाळाला जन्म दिल्यामुळे संपूर्ण वर्षभर तिला कोर्टवर उतरता आले नाही. त्यामुळे टेनिसमध्ये फारशी चमकदार कामगिरी भारताला नोंदवता आली नाही. आशियाई स्पर्धेत रोहन बोपण्णा-दिविज शरण यांनी मिळवलेले सुवर्ण हेच टेनिसमधील यश म्हणता येईल.

संकलन : तुषार वैती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 2:13 am

Web Title: flashback 2018 article about youth power of indian sportsmans
Next Stories
1 मुंबईला विदर्भविरुद्ध विजय अनिवार्य
2 Pro Kabaddi Season 6 :यूपीचे चक्रव्यूह भेदण्याचे सिद्धार्थपुढे आव्हान
3 Flashback 2018 : वर्षभर ‘ट्विटर’वर रंगली सेहवागची फटकेबाजी
Just Now!
X