04 March 2021

News Flash

Flashback 2018 : क्रीडा क्षेत्रातील या सहा निकालांनी वेधून घेतलं जगाचं लक्ष

आशियाई खेळांमध्ये कबड्डीत भारताचा पराभव अजुनही प्रेक्षकांच्या स्मरणात

भारत विरुद्ध इराण सामन्यातील एक क्षण

2018 हे वर्ष क्रिकेट सह सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांसाठी काहीसं धक्कादायक ठरलं. अनेक आश्चर्यकारक निकालांनी क्रीडाप्रेमींना चांगलाच धक्का दिला. 2018 हे वर्ष संपायला अवघा 1 दिवस शिल्लक असताना आपण या सहा निकालांचा धावता आढावा घेणार आहेत.

1) युएस ओपनमध्ये नवख्या नाओमी ओसाकाकडून सेरेना विल्यम्स पराभूत –

आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सेरेना विल्यम्सने पुन्हा एकदा आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. मात्र 2018 सालातील युएस ओपन स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने सेरेनावर केलेली मात आजही अनेक टेनिस प्रेमींच्या स्मरणात कायम आहे. अंतिम सामन्यात नाओमीने सेरेनावर 6-2, 6-4 अशी मात करत आपलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. याच सामन्यात सेरेना विल्यम्सचं चेअर अंपायर कार्लोस रोमास यांच्याशी जोरदार भांडण झालं. या घटनेमुळे सेरेना पुढचे काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत होती.

2) आशियाई खेळांमध्ये भारतीय कबड्डी संघ इराणकडून पराभूत –

सलग 7 वर्ष आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय कबड्डी संघाला यंदा चांगलाच धक्का बसला. उपांत्य सामन्यात इराणने भारतावर 27-18 अशी मात करत भारताची घौडदौड थांबवली. पुरुषांप्रमाणेच महिला कबड्डी संघालाही इराणच्या महिला संघाने मात दिली. 24-27 अशा छोट्या फरकाने इराणी महिलांनी सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. जगाला कबड्डीची ओळख करुन देणाऱ्या भारतीय कबड्डी संघासाठी हा पराभव डोळे उघडणारा होता.

3) फिफा विश्वचषकात जर्मनी कोरियाकडून पराभूत –

फिफा विश्वचषक हा जगभरातील फूटबॉलप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणी असते. 2018 सालात विश्वचषकाच्या यजमानपदाचा मान रशियाला मिळालेला होता. या स्पर्धेतही काही अनपेक्षित निकाल पहायला मिळाले. 4 विजेतेपदं आणि 4 उप-विजेतेपदं आपल्या नावावर असलेला जर्मनीचा संघ यंदाच्या स्पर्धेतली विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरला होता. मात्र कोरियाकडून 2-0 आणि मेक्सिकोकडून 1-0 ने हार पत्करावी लागल्यानंतर जर्मनीचं आव्हान साखळी फेरीमध्येच संपुष्टात आलं. तब्बल 80 वर्षांनी जर्मनीचा संघ फिफा विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. या निकालामुळे अनेक फुटबॉलप्रेमींना धक्का बसला होता.

4) महिला आशिया चषकात बांगलादेशची भारतीय महिलांवर मात –

सहावेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिलांना यंदाच्या वर्षात, क्वाललांपूर येथे झालेल्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशच्या संघाने भारतीय महिलांवर 3 गडी राखून मात केली. भारतीय महिलांनी दिलेलं 141 धावांचं आव्हान बांगलादेशच्या महिला संघाने 19.4 षटकातच पूर्ण केलं.

याचसोबत कॅरेबियन बेटांवर झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतही भारतीय महिलांनी निराशाजनक कामगिरी केली. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतावर मात करुन अंतिम फेरीचं तिकीट बूक केलं. उपांत्य सामन्यात मिताली राजला संघात जागा न देण्याचा निर्णय चांगलाच गाजला. यानंतर मिताली राज-प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातला वाद, नवीन प्रशिक्षक निवडीचं नाट्यही चांगलचं रंगलं. अखेर डब्ल्यू. व्ही. रामन यांना महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.

5) रॉजर्स कप स्पर्धेत नोवाक जोकोविच पराभूत –

टेनिसमध्ये मानाच्या मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकाव्यानंतर जोकोविच चांगल्याच फॉर्मात होता. यानंतर आगामी रॉजर्स कप स्पर्धेचं विजेतेपदही जोकोविच जिंकणार असं सगळ्यांना वाटत असतानाच ग्रिकच्या स्टेफान्सो त्सित्सीपासने जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यामुळे जोकोविच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.

6) हॉकी विश्वचषकात ऑलिम्पिक विजेता अर्जेंटीना फ्रान्सकडून पराभूत –

28 वर्षांपूर्वी फ्रान्सचा संघ अखेरची हॉकी विश्वचषक स्पर्धा खेळला होता. या स्पर्धेतही फ्रान्सला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यंदाच्या वर्षी ओडीशातील भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्वचषकात फ्रान्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला फ्रान्सकडून 5-3 असा पराभव स्विकारावा लागला. फ्रान्सने अर्जेंटीनाला दिलेल्या धोबीपछाडाची स्पर्धा अनेक दिवस हॉकी चाहत्यांमध्ये सुरु होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 3:00 pm

Web Title: flashback 2018 biggest 6 upset in various sports activities
Next Stories
1 IND vs AUS : कोहली-पुजाराला बाहेर बसवलं तर भारताचीही परिस्थिती बिकट होईल – टीम पेन
2 IND vs AUS : जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – विराट कोहली
3 IND vs AUS : टीम पेनचं रडगाणं सुरुच, म्हणतो भारताला सोयीची खेळपट्टी बनवल्याने आम्ही हरलो !
Just Now!
X