रोमानियाच्या सिमोन हालेपला नमवले

अंतिम फेरी गाठणारी इटलीची पहिली टेनिसपटू
‘सातत्यपूर्ण असातत्य’ ही महिला टेनिसची ओळख कायम राखत इटलीच्या फ्लॅव्हिआ पेनेट्टाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. २६व्या मानांकित पेनेट्टाने द्वितीय मानांकित सिमोन हालेपचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिचा मुकाबला सेरेना विल्यम्स आणि रॉबर्टा व्हिन्सी यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होणार आहे.
उपजत प्रतिभेला सातत्याची जोड देता येत नसल्याने (सेरेना विल्यम्सचा अपवाद वगळता) ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम चारमध्ये दर वेळेला नव्या चेहऱ्याची भर पडते. पहिल्या तीन ग्रँड स्लॅमप्रमाणे अमेरिकन खुली स्पर्धाही त्याला अपवाद ठरली नाही. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी फ्लॅव्हिआ इटलीची पहिली टेनिसपटू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ३३ वर्षीय फ्लॅव्हिआने ‘जुने ते सोने’ याचा प्रत्यय घडवत युवा सिमोनला निष्प्रभ केले. स्वैर सव्‍‌र्हिस, भरपूर चुका यामुळे सिमोनचे अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले.
अवघ्या २८ मिनिटांत फ्लॅव्हिआने खणखणीत सव्‍‌र्हिस आणि अचूक परतीच्या फटक्यांद्वारे पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक पवित्रा कायम राखत अवघ्या तासाभरात फ्लॅव्हिआने इतिहास घडवला. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे दडपण न घेता फ्लॅव्हिआने दिमाखदार खेळ करत अंतिम फेरीत आगेकूच केली. अमेरिकन खुल्या स्पर्धेत गेल्या सात वर्षांमध्ये किमान सहावेळा उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या फ्लॅव्हिआने यंदा आमूलाग्र सुधारणा करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
तप्त वातावरणानंतर पावसाचे आगमन झाल्याने महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या होत्या. ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ विक्रमाच्या प्रतीक्षेत असणारी सेरेना विल्यम्स आणि रॉबर्टा व्हिन्सी या बहुचर्चित लढतीमुळे फ्लॅव्हिआ आणि सिमोन यांच्यातला मुकाबला झाकोळला गेला. मात्र प्रसिद्धीची पर्वा न करता फ्लॅव्हिआने इटलीचा झेंडा अभिमानाने फडकवला.

हा क्षण अद्भुत आहे. अंतिम चार, अंतिम लढत एवढी मजल मारेन असे वाटले नव्हते. सिमोनविरुद्ध मी सर्वोत्तम खेळ केला. अंतिम लढतीसाठी मिळू लागलेल्या प्रेरणादायी गोष्टींचा कसा उपयोग करावा हेच मला समजत नाही. -फ्लॅव्हिआ पेनेट्टा