कोलंबियाचे नागरिक फुटबॉलवर निस्सीम प्रेम करतात. शुक्रवारी कोलंबियाचा संघ ब्राझीलविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या पाश्र्वभूमीवर हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील. त्यामुळे बोगोटा या देशाच्या राजधानीत खास सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे. यापैकी महत्त्वाचे म्हणजे पीठ आणि दाढी करण्याच्या फेसविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कारण विजयाचा आनंद साजरा करण्याच्या  कोलंबियाच्या नागरिकांच्या पद्धती काही निराळ्याच आहेत. कधी ते पीठांचे बॉम्बहल्ले करतात, तर कधी समोरच्या व्यक्तीवर दाढी करण्याच्या फेसाचा वर्षांव करतात. याचे पर्यावसान मग हाणामारीत घडते. ते टाळण्यासाठीच हे मनाई आदेश काढण्यात आले आहेत. याचप्रमाणे शुक्रवारी मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष ज्युआन मॅन्युएल सांतोस उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठी फोर्टालेझामध्ये आहेत. त्यांनी देशातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी कोलंबियाने उरुग्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात चकमकींचे ३२००हून अधिक गुन्हे नोंदले गेले. याशिवाय ३४ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.