आपल्या शानदार खेळाने बॅडमिंटन कोर्ट गाजवणारी सायना नेहवाल आता रॅम्पवॉक करताना दिसणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला भारताची फुलराणी सायना रॅम्पवॉकच्या व्यासपीठावर अवतरणार आहे. सायनासह भारताचा पारुपल्ली कश्यप तसेच मलेशियाचा अव्वल मानांकित ली चोंग वेई हे बॅडमिंटनपटूही रॅम्पवॉकमध्ये सहभागी होणार आहेत.
‘‘आमच्यासाठी हा क्षण अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे. रॅम्पवॉक करणे सोपे नाही, कारण आम्ही मॉडेल नाही, खेळाडू आहोत. मात्र बॅडमिंटनपटूंना अशी संधी मिळते आहे ही चांगली गोष्ट आहे. मला खात्री आहे की प्रत्येक जण या क्षणाचा आनंद लुटेल’’, असे सायनाने सांगितले. सायनाने याआधी २०१० मध्ये हैदराबाद फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता.
डिझायनर कपडे परिधान करण्याच्या कल्पनेने बॅडमिंटनपटू कश्यप सुखावला आहे. ‘‘रॅम्पवॉकबाबत मी उत्सुक आहे. मी कधीच रॅम्पवॉक केलेला नाही. मी चांगल्या प्रकारे सादर होऊ शकेन. बॅडमिंटनमधील अव्वल खेळाडू माझ्यासह रॅम्पवर चालणार आहेत. मी चांगला दिसेन अशी आशा आहे’’, असे कश्यपने सांगितले.