फ्लाईंग शीख म्हणून ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांना करोनाची लागण झाली आहे. ते सध्या त्यांच्या चंडिगढ इथल्या घरात विलगीकरणात आहेत. या आठवड्यामध्ये त्यांच्या स्टाफपैकी एकाला करोनाची लागण झाल्याचं कळत आहे.

संपूर्ण सिंग परिवाराची करोना चाचणी करण्यात आली. मिल्खा सिंग यांची पत्नी आणि भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर, सून कुदरत आणि नातू हरजाई मिल्खा सिंग यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मिल्खा यांच्या पत्नी निर्मल यांनी इंडियन एकस्प्रेसशी बोलताना याविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, या आठवड्याच्या सुरुवातीला आमच्या स्वयंपाक्यांपैकी एकाला करोनाची लागण झाली. त्याने ही गोष्ट आम्हाला सांगताच आम्ही चाचणी करायचं ठरवलं. दुर्दैवाने माझे पती मिल्खा सिंग यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल रात्रीपर्यंत त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मात्र, काल रात्री त्यांना थोडा ताप आला होता. ते सध्या गृहविलगीकरणात असून त्यांचा तापही आता कमी आला आहे.

९१ वर्षीय मिल्खा सिंग हे चंडिगढ गोल्फ क्लबचे नियमित सदस्य होते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते घरातून बाहेर गेलेले नाहीत. त्यांचा मुलगा आणि गोल्फचा आंतरराष्ट्रीय खेळाडू सध्या सामन्यासाठी दुबईला गेला आहे. तो पुढच्या आठवड्यात भारतात परतणार आहे. सिंग हे एका क्रीडा संकुलामध्ये करोना रुग्णांसाठी कोविड केअर मिनी सेंटरचं उद्घाटन करणार होते.

याविषयी त्यांच्या पत्नी निर्मल म्हणाल्या, त्यांना कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि ते आज तिकडे जाणारही होते. ते करोना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचं पालन करत होते. ते दोन मास्कही परिधान करत होते. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.