मागील हंगामात बराच काळ मला तंदुरुस्तीच्या समस्येशी झुंजावे लागले होते. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेपूर्वी स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त बनवण्यावर मी लक्ष केंद्रित केले असल्याचे भारताचा दुहेरीतील प्रमुख बॅडमिंटनपटू प्रणव जेरी चोप्रा याने सांगितले.

गतवर्षी प्रणवला खांद्याच्या दुखापतीने त्रस्त केल्यानंतर डेंग्यूदेखील झाल्याने त्यात त्याचा बराच काळ वाया गेला. गेल्या आठवडय़ात गुवाहाटीत झालेल्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेच्या दुहेरी गटात प्रणवने चिराग शेट्टीसोबत विजेतेपद पटकावले होते.

‘‘गतवर्षीच्या दुखापतीनंतर यंदा दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद ही माझ्यासाठी खूप मोठी कमाई होती. त्या दुखापतीमुळे मी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ादेखील खूप संत्रस्त झालो होतो. त्यामुळे हे विजेतेपद माझ्या दृष्टीने पुन्हा आत्मविश्वास मिळवून देणारे होते. ही लयी आणि तंदुरुस्ती अशीच कायम राखण्यावर मी भर देणार आहे. तसेच तंदुरुस्तीवर अजून मेहनत घेऊन त्यात वाढ करण्याचा माझा उद्देश आहे,’’ असेही प्रणवने सांगितले. प्रणव हा मिश्र दुहेरीत भारताच्या एन. सिक्की रेड्डीसमवेत खेळतो. त्या दोघांनी मिळून गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.