बेंगळूरु : इंडिया रेड संघाचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिभावान डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनच्या कामगिरीवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात निवड समितीसह सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा असणार आहेत. बेंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात इंडिया रेड आणि इंडिया ग्रीन या संघातून कोण विजेतेपद मिळवणार, हे पाहणे उत्सुक ठरेल.

या स्पर्धेचा अंतिम सामना पाच दिवस रंगणार असून गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात हा सामना खेळला जाणार आहे. त्याशिवाय या सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची सोयही करण्यात आली आहे.

झारखंडचा २१ वर्षीय किशनने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या मालिकेत भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली होती. एकीकडे ऋषभ पंत कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत असताना किशनला निवड समितीला स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडण्याची ही सुवर्णसंधी आहे. इंडिया रेडची भिस्त अनुभवी करुण नायरवर असून गोलंदाजीत आवेश खानवर मदार आहे.

दुसरीकडे इंडिया ग्रीनचे नेतृत्व करणाऱ्या फैझ फझलकडे दोन रणजी विजेतेपदांचा अनुभव असून त्याला अक्षत रेड्डीकडून चांगली साथ लाभत आहे. गोलंदाजीत इंडिया ग्रीनची भिस्त मयांक मरकडे आणि अक्षय वखारे या फिरकीपटूंवर आहे.

’ सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २