देशाला पहिलेवहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे राज्यातील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ मिळण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून (डब्ल्यूएफआय) पाठपुरावा करण्यात येणार आहे. १९५२ च्या हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये जाधव यांनी कांस्यपदक जिंकले होते.

‘‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद गेली अनेक वर्षे जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ मिळावा, यासाठी  भारतीय कुस्ती महासंघासह भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) पाठपुरावा करत आहे. अखेर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली आहे.

त्याशिवाय राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कुस्तीच्या दंगली आणि या खेळाची मैदाने आयोजकांकडून परवानगी मागितल्यावर त्यांना ती देण्यात येतील, असे राज्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढे त्या दंगलींमध्ये किंवा मैदानांमध्ये अधिकृत पंच हे कुस्ती संघटनेकडून देण्यात येणार आहेत. वरिष्ठ महिला गटासह १५, १७, २० आणि २३ वर्षांखालील मुलामुलींच्या स्पर्धाही प्रायोजकांच्या माध्यमातून यापुढे आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यातील १६ आणि २० वर्षांखालील कुस्तीपटूंची निवड चाचणी लवकरच घेण्यात येणार आहे. त्यातून गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना राज्य संघटनेच्या मामासाहेब मोहोळ संकुलात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कुस्ती स्पर्धाच्या परवानगीची मागणी

करोनामुळे गेले आठ महिने कुस्ती स्पर्धा पूर्णपणे ठप्प आहेत. विविध खेळांना परवानगी मिळाली असली तरी थेट एकमेकांशी संपर्क येणाऱ्या कुस्ती खेळाला परवानगी मिळाली नाही. याबाबत केंद्राकडे आणि राज्याकडे राज्य कुस्ती संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. केंद्राकडून आणि राज्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य स्पर्धा घेण्यात येतील, असे लांडगे यांनी स्पष्ट केले.