अ‍ॅलेक्स कॅरी, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

ऋषिकेश बामणे

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या प्रदीर्घ क्रिकेट दौऱ्याबाबत सगळीकडेच चर्चा रंगू लागली आहे. परंतु माझ्या मते दोन्ही संघांतील खेळाडूंच्या दृष्टीने या दौऱ्यातील सर्वाधिक कठीण आव्हान जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने व्यक्त केली.

या दौऱ्याला २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे प्रारंभ होईल. त्यानंतर उभय संघांत तीन ट्वेन्टी-२० आणि चार कसोटी लढतींची मालिकाही रंगणार आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रेक्षक प्रवेशासह खेळल्या जाणाऱ्या या संपूर्ण दौऱ्याचे सोनी समूहाच्या क्रीडा वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. एकंदर या दौऱ्यातील आव्हाने आणि ‘आयपीएल’च्या अनुभवाविषयी ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघातील २९ वर्षीय फलंदाज कॅरीशी केलेली खास बातचीत-

* भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्वंद्वांकडे तू कशा रीतीने पाहतो आहेस?

निश्चितच हा दौरा आमच्यासाठी सर्व पातळ्यांवर महत्त्वपूर्ण आहे. करोनामुळे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळपास गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. या दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा चालना मिळेल, तसेच अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भारतासारख्या कडव्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळताना फार मजा येईल. याआधीच्या दौऱ्यात भारताने आमच्यावर वर्चस्व गाजवले होते. परंतु यंदा त्यांना त्यावेळच्या तुलनेत दुप्पट परिश्रम घ्यावे लागतील.

* कोहलीच्या अनुपस्थितीचा कसोटी मालिकेवर कितपत परिणाम होईल?

कोहली हा सध्याच्या घडीला विश्वातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे, यात शंका नाही. ऑस्ट्रेलियातील सर्व खेळाडू तसेच चाहत्यांनाही त्याच्यातील क्षमतेची जाणीव असून त्याच्याशिवाय भारताच्या कसोटी संघाची ताकद नक्कीच कमी होईल. यामुळे मालिकेतील चुरसही कमी होण्याची शक्यता आहे. २०१८च्या तुलनेत यंदा स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेन हे तीन आघाडीचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात परतल्यामुळे मी स्वत:ही या मालिकेसाठी फार उत्सुक आहे. त्यामुळे कोहलीच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर असला तरी त्याच्या अनुपस्थितीचा लाभ उचलत यावेळी ऑस्ट्रेलियाच कसोटी मालिका जिंकेल, याची मला खात्री आहे. त्याशिवाय एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्माची अनुपस्थितीही भारताला महागात पडू शकते, असे मला वाटते.

* जैव-सुरक्षित वातावरणाची आता तुम्हा खेळाडूंना सवय झाली आहे का?

खरे सांगायचे तर, भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधील आव्हानांबाबत जितक्याही चर्चा रंगत आहेत, त्यातील सर्वाधिक कठीण आव्हान हे जैव-सुरक्षित वातावरणाचेच आहे. ‘आयपीएल’दरम्यान आम्ही जवळपास दोन महिने कुटुंबीयांपासून दूर राहिलो. त्याशिवाय बाहेरच्या विश्वाशीही संपर्क तुटला गेला. आता भारताविरुद्धचा दौराही जानेवारी महिन्यापर्यंत लांबणार असल्याने या काळात स्वत:चे मानसिक संतुलन राखणे प्रमुख आव्हान असेल. त्यामुळे सराव सत्रादरम्यान आम्ही एकमेकांसह अधिकाधिक वेळ घालवण्यावर भर देतो. कारण सराव करून हॉटेलमध्ये परतल्यानंतर आम्हाला खोलीच्या बाहेर निघण्यासही परवानगी नाही. परंतु सध्याची स्थिती पाहता ते आवश्यक असल्याने येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात आम्ही या दौऱ्यासाठी तयारी करत आहोत.

* कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ‘आयपीएल’च्या अनुभवाविषयी काय सांगशील?

गतवर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेदरम्यान जेव्हा मला दिल्ली कॅपिटल्सने संघात सहभागी करून घेतले, तेव्हापासूनच मी ‘आयपीएल’ खेळण्यासाठी उत्सुक होतो. परंतु त्यासाठी सप्टेंबर महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल, असे वाटले नव्हते. दिल्लीच्या संघात माझ्यासारख्याच वृत्तीच्या अनेक खेळाडूंचा भरणा असल्याने मागील दोन महिने कधी उलटले हे समजलेच नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना फार काही शिकण्यासही मिळाले. त्याच्यामध्ये भारताचे कर्णधारपद भूषवण्याची क्षमता नक्कीच आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना अधिक जवळून जाणून घेता आले. ‘बीसीसीआय’ने या कठीण काळात आम्हा सर्वाना खेळण्याची संधी दिल्यामुळे हा अनुभव कायम स्मरणात राहील.