भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सोमवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विदर्भाविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी इशांतच्या कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विदर्भाविरुद्धच्या लढतीतील दुसऱ्या डावात पाचवे षटक टाकताना इशांतचा पाय मुरगळला आणि सूज आली. चेंडू टाकल्यावर पायचीतचे अपील करताना अचानक पायातून वेदना झाल्याने इशांत जमिनीवर कोसळला. संघसहकाऱ्यांच्या मदतीने इशांतला मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे विदर्भाविरुद्धच्या उर्वरित लढतीत इशांत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता इशांतला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी नियमाप्रमाणे बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाणे अनिवार्य आहे. भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यात २१ ते २५ फेब्रुवारी आणि २९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान दोन कसोटी सामने खेळणार आहे.