यजमान ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील लढत काही मिनिटांत सुरू होणार होती. सॅल्वाडोरमधील पोटरे दा बॅरा या देखण्या समुद्रकिनारी ज्युलिओ जीझस मारिजुएना (अंमली पदार्थ) विकत होता. त्याच्या उघडय़ा छातीवर वेगवेगळे टॅटू गोंदलेले. त्यापैकी एक टॅटू त्याच्या व्यवसायाची जाहिरात करणारा. त्याच्याकडे आता मारिजुएनाची तीन पाने शिल्लक आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो साद घालत होता. ‘‘या औषधी वनस्पती माझ्यासाठी देव आहेत. यावर माझ्या मुलांचे पोट भरते. मात्र आज ते उपाशीच राहतील बहुतेक!’’ मी तात्काळ विचारतो, ‘‘असे का?’’ यावर त्याचे उत्तर होते, ‘‘कोपा डू मुंडो (विश्वचषक) माझ्या धंद्यासाठी वाईट आहे. सेलाको (ब्राझीलचा संघ) संपूर्ण देशाला प्रेरित करतो. सगळा देश चैतन्याने भारला जातो आणि ते हे सगळे फुकटात करतात.’’
ब्राझील आणि मेक्सिको यांचा सामना सुरू असताना दुपारी ४ ते सायंकाळी ६ या कालावधीत दोन लाख संभाव्य ग्राहक जीझसच्या दुकानासमोरून जातात. इथून पुढे ते फिफाने मान्यता दिलेल्या पाटरे दा बॅरा किनाऱ्याच्या दिशेने रवाना होतात. मात्र यापैकी जेमेतेम ४० जण जीझसच्या दुकानातल्या वस्तू खरेदी करून आपल्या खिशात टाकतात. अन्य एक लाख नव्याण्णव हजार नऊशे साठ चाहते जीझसच्या दुकानाकडे कटाक्षही न टाकता, उत्तेजक द्रव्यांशिवायच्या जगातल्या सर्वात मोठय़ा पार्टीसाठी रवाना होतात.
बारोक्यू शैलीत बांधण्यात आलेले चर्च आणि सतराव्या शतकातला पोर्तुगीज किल्ला यांच्यादरम्यान वसलेले पोटरे दा बॅरा हे शहर विचित्र या शब्दाला साजेसे आहे. योगायोगाने याच किनाऱ्यावर पोर्तुगीज वसाहतकारांनी पहिले पाऊल टाकले. त्यामुळेच सॅल्वाडोर हे ब्राझीलमध्ये सगळ्यात जुने शहर आहे. मात्र पोर्तुगीजांची जहाजे आज अवतरली असती तर कदाचित त्यांनी हा किनारा बाजूला सारून आगेकूच केली असती. कारण तीन अतिभव्य आकाराच्या महापडद्यावर आपल्या देशाला समर्थन देण्यासाठी लाखभर फुटबॉलप्रेमींचा उत्साही जल्लोष पोटरे दा बॅराला उन्मादित हत्तीच बनवते.
मेगाडेथ बँडच्या मैफलीला किंवा नरेंद्र मोदींच्या रॅलीला जशी गर्दी पाहायला मिळते, तशीच स्थिती पोटरे दा बॅराची आहे, कदाचित दोन्हींसारखीच. थोडय़ाच वेळात फुटबॉलपटू तो महापदडा व्यापतात. कल्लोळाला सुरुवात होते. इथे कोणतीही उत्तेजक द्रव्य नाहीत. पण मोठय़ा प्रमाणावर सेरव्हजाचा (बीअर) महापूर आलेला. दर दहा मीटरवर थर्माकोलची साधारण वॉशिंग मशीनच्या आकारची बास्केट विक्रीला घेऊन बसलेली होती. यामध्ये बीअर कॅन्स आणि बर्फ होता. प्रत्येक महिला वेगवेगळी किंमत सांगते. मात्र साधारण किंमत म्हणजे चार कॅन बीअर दहा डॉलर्सला. माझ्या बरोबरीची मंडळी तहानलेली होती. माझ्याकडच्या शंभर डॉलरची नोट पाहून थर्माकोलचा बॉक्स घेऊन बसलेली ती महिला आणखी दहा बीअरचे टिन आम्हाला देते. दोन लाख वगैरे समूहाचा भाग असलेले आम्ही इस्टाडिओ फोर्टालीझाच्या दिशेने रवाना झालो. चार बालकांची आई असलेली महिला नेयमारला पाहताच जवळपास किंचाळली. त्याची नवीन केशरचना अचंबित करणारी होती.
पोटरे दा बॅरामध्ये ब्राझीलचे राष्ट्रगीत गायले गेले. सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी रास्तफारी चळवळीचा एक माणूस माइकचा ताबा घेतो. पुढच्या दीड तासांसाठी तो आमचा समालोचक असणार आहे. माइकची चाचणी करण्यासाठी तो मोठय़ाने ‘गोल..’ असे ओरडतो. पोटरे दा बॅरातले चाहतेही त्याला त्याच प्रतिसादात प्रत्युत्तर देतात. सामना सुरू होतो. मात्र ब्राझीलच्या गोलऐवजी मेक्सिकोचा गोलरक्षक ओकोआचीच चर्चा होते. सामना ०-० बरोबरीत सुटतो. १९७८नंतर पहिल्यांदाच ब्राझीलला प्राथमिक फेरीच्या लढतीत गोल करता आलेला नाही. बीअरचे कॅन रिते होतात. गोल न झाल्याची पोकळी चाहत्यांच्या मनात ठेवूनच..
सामना संपून मंडळी परतीच्या मार्गाला लागले. जीझसचे दुकान आता तेजीत होते. ब्राझील जेव्हा गोल करत नाही, तेव्हा त्याच्या मुलांना खायला मिळते. त्यांच्यासाठी हा सुदिन ठरला!