आशियाई चषकासाठी भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारताचा संघ २७ डिसेंबरला अबुधाबी येथे ओमानशी झुंजणार असल्याचे फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान आशियाई चषकाचे सामने रंगणार आहेत. भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दर्जेदार देशांविरुद्ध खेळला जाणारा हा तिसरा सामना आहे. भारताने यापूर्वी चीनविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधली होती. तर जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात भारताला १-० असा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आशियाई चषकामध्ये भारतीय संघाचा समावेश अ गटात तर ओमानचा संघ फ गटात आहेत. फिफाच्या जागतिक क्रमवारीनुसार ओमानचा संघ ८४ व्या स्थानी तर भारताचा संघ ९७ व्या स्थानावर आहे. आशियाई चषकात भारताचा पहिला सामना ६ जानेवारीला थायलंडशी अबुधाबी येथे होणार आहे. त्याशिवाय भारताच्या गटात बहारिन आणि संयुक्त अरब अमिरात यांचादेखील समावेश आहे. त्या पाश्र्वभूमीवर भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी भारताला ओमानविरुद्धचा सामना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. ‘‘बहारिन आणि संयुक्त अरब अमिरात या संघांची फुटबॉल खेळण्याची शैली ओमानशी मिळती जुळती आहे.

भारताला अ गटात या दोन्ही संघांशी झुंजायचे असल्याने त्या शैलीत खेळणाऱ्या संघांविरुद्ध खेळणाऱ्यांशी कशी लढत द्यायची त्याची पूर्वतयारी होणार आहे. भारतीय खेळाडूंना आपापसातील ताळमेळ राखणे आणि काय करायचे आहे, ते समजून खेळ करण्यावर भर द्यायला हवा,’’ असेदेखील कॉन्स्टन्टाइन यांनी नमूद केले.