क्वालालंपूर : भारताला २०२२ मधील ‘एएफसी’ महिला आशियाई फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारतात महिलांमध्ये फुटबॉल खेळाचा अधिकाधिक विस्तार व्हावा म्हणून हे यजमानपद देशाला ‘आशियाई फुटबॉल संघटने’कडून बहाल करण्यात आले आहे. भारतात या वर्षांअखेरीस १७ वर्षांखालील कुमारी विश्वचषक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतासह चायनीज तैपेई आणि उझबेकिस्तान हे देश उत्सुक होते. मात्र त्यात भारताने बाजी मारली. सामन्यांसाठी डी. वाय. पाटील स्टेडियम, ट्रान्स स्टेडिया एरिना आणि फर्तोडा स्टेडियम ही तीन ठिकाणे भारताकडून मंजूर करण्यात आली आहेत.

भारताने याआधी २०१६मध्ये एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धा आणि २०१७मध्ये १७ वर्षांखालील कुमार विश्वचषकाचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषवले आहे. ‘‘आशियातील महिला फुटबॉलसाठी एएफसी महिला आशियाई फुटबॉल स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. याआधी ही स्पर्धा जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात महिला फुटबॉलचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होणे आवश्यक आहे म्हणूनच भारताला संधी देण्यात आली आहे,’’ असे ‘एएफसी’च्या महिला समितीच्या अध्यक्षा मफूझा अख्तर यांनी सांगितले.

यंदा या स्पर्धेत ८ ऐवजी १२ संघ सहभागी होतील. चार संघांचे तीन गट करण्यात येतील. त्यामुळे आठ संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पात्रतेसाठी चुरस असणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२२मध्ये या स्पर्धेचे आयोजन अपेक्षित आहे.