क्रिकेट, कबड्डी, रेसलिंग, फुटबॉल अशा खेळांच्या लीग्सचं सध्या पेव फुटलंय. पण फुटबॉल लीगचं तरुणाईमध्ये असलेलं वेड अलीकडे कमी होताना दिसतंय.

भारतामध्ये क्रीडा या विषयात रस घेणाऱ्या लोकांची काहीच कमतरता नाहीये. खास करून प्रेक्षकांची! साध्या गल्लीबोळात चालू असलेला एखादा कबड्डी सामना किंवा लहानसहान मुलांचा चाललेला क्रिकेटचा खेळ; काहीही असलं तरी येणारा जाणारा माणूस एखादं मिनिट वाया घालवून डोकावून जातोच. त्यातून क्रिकेट म्हणाल तर उभ्या भारताने मान्य केलेला धर्म. आयपीएल सुरू होऊन तब्बल दशक उलटलं तरीही त्यासाठी असलेला प्रेक्षकांचा उत्साह आणि प्रतिसाद हा टीचभरसुद्धा कमी झालेला दिसत नाही. अनेक वर्षांच्या प्रवासात या क्रिकेटच्या लीगने ढीगभर यश मिळवले आणि प्रगतीचे आलेख मोठेच होत गेले. याच पाश्र्वभूमीवर मागील चार-पाच वर्षांत बाकीच्या काही खेळांनीदेखील आपापल्या लीग सुरू केल्या. त्यामध्ये बॅटिमटन, कबड्डी, कुस्ती, हॉकी अशा खेळांचा समावेश आहे. त्यातलाच एक खेळ म्हणजे फुटबॉल. ‘आयएसएल’ या छोटय़ा नावाने प्रसिद्ध असलेली इंडियन सुपर लीग २०१३ साली सुरू झाली.

आयपीएलप्रमाणेच सुरुवातीला आठ संघ घेऊन या स्पध्रेची सुरुवात झाली. मदानावर खेळणारे चेहरे अगदी ओळखीचे जरी नसले तरी संघांचे मालक हे अगदी ओळखीचे होते. बॉलीवूडचे तारे आणि क्रिकेटमधील दिग्गज अशा मिश्रणातून या स्पध्रेला वेगळी रंगत आली होती. त्याचमुळे पहिल्या सीझनमध्ये सामने पाहायला प्रचंड मजा आली. प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियमबरोबर या स्पध्रेची यशस्वी सुरुवात झाली. दुसऱ्या सीझनमध्येदेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला राहिला. पण सध्या सुरू असलेल्या आयएसएलच्या चौथ्या सीझनमध्ये या स्पध्रेची लोकप्रियता कमी झाल्यासारखी वाटते. स्पध्रेच्या सुरुवातीच्या काळात वाटणारा उत्साह आता काहीसा लोप पावत चाललेला आहे. अर्थात हौशी प्रेक्षक आजसुद्धा फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी उपस्थित राहतात, पण बऱ्याच सामन्यांमध्ये स्टेडियम अध्र्याहून कमी भरलेली असतात. मुख्यत: आम्हा तरुणांमध्ये या स्पध्रेचे महत्त्व बरेचसे कमी झाले आहे.

खरं तर फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. भारतामध्येही फुटबॉल चाहत्यांची कमी नाही. परंतु जगभर प्रसिद्ध असणाऱ्या युरोपियन देशांमधील फुटबॉल लीग्स आणि या स्पर्धामधील प्रचंड फॅन बेस असणारे बलाढय़ संघ यांच्यापुढे नव्या नवख्या आयएसएलची आणि तुलनेने लहान संघांची प्रसिद्धी कायम ठेवणं हे मोठय़ा कष्टाचं काम. आपल्या देशामध्ये इंग्लिश प्रीमियर लीग आणि स्पेनमधील ला लीगा या दोन फुटबॉल लीगचे वेड विशेष दिसून येते. बास्रेलोना, रियल माद्रिद, मॅन्चेस्टर युनायटेड, मॅन्चेस्टर सिटी, लिव्हरपूल, आस्रेनल अशा मोठय़ा, जगविख्यात क्लब्सकडे अचाट आíथक संपत्ती आहे. त्याचबरोबर जगातील महान आणि लोकप्रिय खेळाडू या क्लब्सकडून खेळतात. हे खेळाडूच खरे आकर्षणिबदू ठरतात. त्यामुळे भारतातील तरुणाईचे लक्ष या खेळाडूंच्या हालचालीकडे, या क्लब्सच्या खेळाकडे अधिक झुकलेले आहे. आयएसएलमध्ये तुलनेने आíथक बळ कमी आहे आणि सध्याच्या मोसमात केवळ दहाच संघ सहभागी असल्यामुळे स्पध्रेची चुरस फार मोठी नाही आहे.

इंडियन सुपर लीगमध्ये काही परदेशी खेळाडू आणून या स्पध्रेत रंजकता आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु क्वचितच मोठे चेहरे या स्पध्रेत येऊन खेळताना दिसतात. यातील बरेचसे चेहरे कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात या स्पध्रेत सहभागी होतात. अर्थात त्यांचा सहभाग चांगला वाटतो पण त्यांचा वेग, चपळता खालावलेली दिसून येते. शिवाय या लीगमधील सांघिक खेळ हादेखील बरेचदा डळमळीत दिसतो. अर्थात भारतामध्ये अजून फुटबॉलचा विकास घडत आहे आणि एखाद्दोन वर्षांत त्यांनी जगातील अव्वल संघांसारखा खेळ करावा अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आणखी एक कारण म्हणजे आयएसएलचे सामने आठवडाभर चालतात त्यामुळे कंटाळा येतो ही गोष्ट वेगळीच, पण आठवडय़ातील प्रत्येक दिवशी सामना पाहणे शक्य होतेच असे नाही. याउलट बहुतांश युरोपियन फुटबॉल स्पर्धा या वीकेंड्सना खेळल्या जातात. म्हणूनच अधिक सोयीच्या वेळेत उत्तम खेळ पाहणे शक्य होते.

आयएसएलकडे दुर्लक्ष होण्यासाठी फक्त इतकीच कारणे  नाहीयेत. आपल्याच देशात चालू असलेल्या इतर खेळांच्या स्पर्धा हादेखील एक मोठा पलू आहे. क्रिकेटप्रमाणेच भारताची कबड्डी या खेळातही जागतिक पातळीवर ख्याती आहे. तासभर चालणारा हा खेळ प्रचंड रोमांचक आहे. त्यामुळे प्रो कबड्डी लीग लोकप्रिय आहे. याचबरोबर सुरू झालेली प्रो रेसिलग लीगदेखील कमी काळात भरपूर मनोरंजन देऊन जाते. जागतिक पातळीवर भारताचे नाव कोरलेल्या काही मल्लांचा या स्पध्रेत सहभाग आहे त्यामुळे या लीगने देखील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एकूणच भारतातील इतर खेळांची लोकप्रियता आणि फुटबॉल जगातील महाकाय युरोपियन प्रतिस्पर्धी अशा गोष्टी लक्षात घेता आयएसएलचं भविष्य काय असेल कोण जाणे!
जयदेव भाटवडेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा