पॅरिस हल्ल्याच्या कटू आठवणी उराशी बाळगत फ्रान्समध्ये फुटबॉल लढतींचे पुनरागमन होत आहे. आठवडाभरापूर्वी फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात फुटबॉल लढत सुरू असतानाच मैदानाबाहेर दहशतवादी हल्ला झाला होता. कनिष्ठ क्रीडा मंत्री थिअरी ब्रियलर्ड आणि फुटबॉल पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून लीग एक आणि दोनच्या लढती खेळवण्याचा निर्णय घेतला. या सामन्यांच्या वेळी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रेक्षकांविनाच रिकाम्या स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
‘‘दहशतवादी हल्ला ही अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हल्ल्याचा निषेध करून दोषींना शिक्षा करणे आवश्यक आहेच. मात्र त्याचवेळी दैनंदिन वेळापत्रक स्वीकारत समाजविघातक प्रवृत्तींना प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे,’’ असे ब्रियलर्ड यांनी सांगितले.
‘‘या लढतींसाठी चाहते देशभरातून एकत्र येतात. मात्र सद्यपरिस्थितीत त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे कठीण आहे. परदेशातून दाखल होणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी असते. मात्र आता तो धोका पत्करणे योग्य होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असे फुटबॉल लीगचे अध्यक्ष फ्रेडरिक थिरिझ यांनी स्पष्ट केले.