करोनाच्या संसर्गामुळे एकीकडे संपूर्ण क्रीडा विश्व स्थगित झाले असले तरी दक्षिण कोरिया मात्र नव्या उमेदीने आणि अनोख्या नियमांसह फुटबॉल सामन्यांना सुरुवात करण्यासाठी आतुर आहे. शुक्रवारी कोरिया लीगच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून यावेळी चाहत्यांविना रंगणाऱ्या या सामन्यांत खेळाडूंना हस्तांदोलन करण्याबरोबरच अन्य खेळाडूंशी संवाद साधणे तसेच गोल केल्यानंतर एकमेकांजवळ जाऊन जल्लोष करण्यासही मनाई आहे.

दक्षिण कोरिया फुटबॉल संघटनेने बुधवारी त्यांच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर याविषयी जाहीर केले. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांनी फुटबॉल स्पर्धाना सुरुवात करणारा दक्षिण कोरिया हा पहिलाच देश ठरणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून येथील बेसबॉल स्पर्धानाही सुरुवात झाली. शुक्रवारी पहिला सामना गतविजेते जोनबक मोटर्स विरुद्ध सुवान ब्लेविंग्स यांच्यात खेळला जाणार असून कोरियाबाहेरील नागरिकांना कोपा ९० फुटबॉल लाइव्ह या ‘यू टय़ूब’ वाहिनीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

बुंदेसलिगाच्या लढतींना लवकरच सुरुवात

जर्मन फुटबॉल संघटना लवकरच बुंदेसलिगाच्या सामन्यांना सुरुवात करण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून जर्मनीमध्ये करोनाबाधितांची संख्या घटली असून मृतांचा आकडाही नियंत्रणात आला आहे. त्यामुळेच जर्मन संघटनेने ३६ क्लब्सला याविषयी कळवले असून २१मेपासून सामन्यांना पूर्वीप्रमाणे सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ब्राझिलच्या फुटबॉलपटूंकडून आरोग्य सुरक्षेची मागणी

फुटबॉलच्या सामन्यांना पूर्वीप्रमाणे सुरुवात करण्यापूर्वी ब्राझिलच्या फुटबॉलपटूंनी आरोग्य सुरक्षेची मागणी केली आहे. मंगळवारी ब्राझिलच्या १६ खेळाडूंनी एक चित्रफीत ‘ट्विटर’वर पोस्ट करून यासंबंधी मागणी केली. ब्राझिलचे नागरिक फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. आम्हालाही त्यांच्यासाठी मैदानावर परतायला नक्कीच आवडेल, परंतु आम्हाला आमच्या आरोग्याविषयी विचार करणे गरजेचे आहे, हा संदेश त्या चित्रफीतीद्वारे पसरवण्यात आला.

करोनामुळे फुटबॉलपटूंना १० अब्जांचे नुकसान

करोनामुळे युरोपमधील सर्वच फुटबॉल लीग बंद असल्याने सर्व युरोपियन खेळाडूंना तब्बल १० अब्ज युरोचे नुकसान होऊ शकते. युरोपमधील पाच महत्त्वाच्या स्पर्धा सध्या अनिश्चित काळासाठी बंद असून यामध्ये प्रामुख्याने जर्मनी, इंग्लंड, इटली, पोर्तुगाल आणि स्पेनचे खेळाडू सहभागी असतात.

रोनाल्डोशिवाय युव्हेंटसचा सरावाला प्रारंभ

ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय बुधवारी युव्हेंटसच्या खेळाडूंनी सरावाला प्रारंभ केला. प्रत्येक खेळाडू संघाच्या सराव केंद्रात एकएकटा सराव करत असून रोनाल्डोला मात्र अद्याप या सरावात भाग घेण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. आरोन राम्से, जिऑर्जिओ शिल्लीनी, जुआन कुआडरे, लिओनाडरे बोनुसी या खेळाडूंनी बुधवारी सराव केला.