काही वेळा अनिच्छेनेच एखाद्या खेळात आलेला खेळाडू कालांतराने त्याच खेळात चमक दाखवतो. उत्तर आर्यलडच्या ओवेन कॅथकार्ट याच्याबाबत असेच घडत आहे. केवळ १३ वर्षांच्या या खेळाडूने टेबल टेनिस क्षेत्रातील भावी विश्वविजेता म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. त्याचे लक्ष्य आहे ऑलिम्पिक पदकाचे.

ओवेनला बालपणापासूनच फुटबॉलची आवड आहे. मात्र त्याची मोठी बहीण एलिमा ही टेबल टेनिसच्या सरावासाठी ऑर्मेयू क्लबमध्ये जात असे. तिच्यासोबत ओेवेन जायचा, त्या वेळी ओवेन हा केवळ आठ वर्षांचा होता. तेथील मार्गदर्शक किथ नॉक्स यांनी ओवेनला खेळण्याचा नेहमी आग्रह करीत असत. सुरुवातीला नकारघंटा लावणारा ओवेन रॅकेट हातात घेण्यास तयार झाला. हळूहळू त्याला या खेळाची आवडही निर्माण झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये ओवेन हा केवळ आर्यलडमधील नव्हे तर युरोपियन टेबल टेनिस क्षेत्रातील उगवता तारा झाला आहे.

हौशी खेळाडूंच्या स्पर्धेप्रमाणेच त्याने व्यावसायिक स्पर्धामध्येही आपला ठसा उमटवला आहे. सातही दिवस तो सरावात घालवतो. उत्तर आर्यलडचे ज्येष्ठ मार्गदर्शक जॉन मर्फी यांच्या मागदर्शनाचाही तो लाभ घेत आहे. ऑर्मेयू क्लबबरोबरच तो उलस्टार या व्यावसायिक संघाकडूनही खेळतो. त्यामुळे दोन्ही क्लबच्या खेळाडूंबरोबर त्याला सराव करावा लागतो. त्याने युरोपियन व्यावसायिक स्पर्धामध्ये इंग्लंड, जर्मनी, हंगेरी, बेल्जियम, नेदरलँड्स आदी देशांमधील अनेक अनुभवी खेळाडूंवर मात करण्याचा पराक्रम केला आहे.

हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्पर्धामधील सहभागामुळे त्याची शाळा अनेक वेळा बुडते. त्याबाबत विचारले असता ओवेन म्हणाला, ‘‘खेळात गांभीर्याने कारकीर्द घडवत असल्यामुळे मी शालेय जीवनाला मुकत आहे. मित्रांसमवेत फुटबॉलची मजा मी घेऊ शकत नाही. कौटुंबिक समारंभ, मित्रांबरोबर वाढदिवस साजरे करणे आदी गोष्टींचा आनंद मला मिळत नाही. अर्थात खेळांत नाव कमवायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. मला घरच्यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. शाळेतील शिक्षक व माझे मित्र मला फावल्या वेळेत अभ्यासाकरिता खूप मदत करतात. अर्थात माझ्यासाठी शालेय शिक्षण महत्त्वाचे नसून या खेळावर झोकून देण्यास मी प्राधान्य दिले आहे.’’

तुझा आदर्श कोण आहे असे विचारले असता ओवेन म्हणाला, ‘‘आमच्या देशाचा बॉक्सिंपटू कार्ल फ्रॅम्प्टन हा माझ्यासाठी आदर्श आहे. कारण त्याने इंग्लंडमध्ये अनेक वर्षे सराव करीतच नाव कमावले आहे. युरोपियन व राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. आता मला वेध लागले आहेत ते जागतिक व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळविण्याचे. मी अजून लहान असल्यामुळे या दोन्ही स्पर्धासाठी मला पुष्कळ संधी आहे. तोपर्यंत एकाग्रतेने सराव करण्यावर व खेळात अधिक परिपक्वता आणण्याचा मी प्रयत्न करीत आहे.’’