‘युरोपचा फुटबॉल वर्ल्डकप’ म्हणून ओळखला जाणाऱ्या युरो कपला दणदणीत सुरुवात झाली. मात्र स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ब गटात डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यात सामना सुरू होता, मात्र डेन्मार्कचा खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन अचानक मैदानावर कोसळला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एरिक्सनला लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले, तोपर्यंत हा सामना स्थगित करण्यात आला.

ख्रिश्चियन एरिक्सनसोबतच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरला. एरिक्सनसोबत मॅच रेफरी अँथनी टेलरही सोशल मीडियावर व्हायरल झाले. एरिक्सन जमिनीवर कोसळल्यानंतर टेलर यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्याकडे धाव घेतली आणि सामना थांबवला. इतकेच नव्हे, तर अँथनी यांनी लगेचच प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय पथकाला मैदानात बोलावले. त्यांच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

हेही वाचा – युरो कपमधील ‘त्या’ धक्कादायक घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं ट्वीट होतंय व्हायरल!

 

 

 

ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात पडल्याचे पाहताच डेन्मार्कच्या खेळाडूंनी त्याच्याजवळ धाव घेतली. तेव्हा बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ख्रिश्चियनभोवती रिंगण करुन ते उभे राहिले आणि त्याला धीर देत होते. या घटनेनंतर वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी ख्रिश्चियनला तपासले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रसंगानंतर यूरो कप समितीने हा सामना स्थगित केला. या घटनेमुळे संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. फुटबॉल चाहतेही तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करताना दिसले.

१९९२मध्ये डेन्मार्कच्या संघाने युरो कप जिंकला होता. प्रतिस्पर्धी संघावर कधीही वरचढ होणारा संघ म्हणून डेन्मार्कची ओळख आहे. कोपनहेगनच्या पार्कन स्टेडियमवर हा सामना खेळला जात होता.