करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा तसेच आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई देशांची पात्रता फेरी लांबणीवर टाकण्यात आल्याने भारतीय फुटबॉल संघाला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आशिया फुटबॉल महासंघाने गुरुवारी अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर याविषयी माहिती दिली.

२०२२मध्ये कतार येथे फिफा विश्वचषक, तर २०२३मध्ये आशिया चषक रंगणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आशियातील संघांचे पात्रता सामने खेळवण्यात येणार होते. परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही पात्रता स्पर्धा आता थेट पुढील वर्षी खेळवण्यात येईल.

भारताने गतवर्षी ओमानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून पात्रता फेरीत ८ ऑक्टोबर रोजी कतारविरुद्ध, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात भारताचा सामना होणार होता.

युरोपा लीग फुटबॉल

सेव्हिया, शॅख्तर डोनेटस्क उपांत्य फेरीत

सेव्हिया आणि शॅख्तर डोनेटस्क या संघांनी युरोपा लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बुधवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात लुकास ओकॅम्पोसने ८८व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलमुळे सेव्हियाने वोल्व्हस संघाला १-० असे नमवले. अन्य उपांत्यपूर्व लढतीत डोनेटस्कने बॅसेलचा ४-१ असा फडशा पाडला. १७-१८ ऑगस्ट रोजी अनुक्रमे सेव्हिया विरुद्ध मँचेस्टर युनायटेड आणि इंटर मिलान विरुद्ध डोनेटस्क यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येतील.