05 July 2020

News Flash

फुटबॉलपटू डोव्हाल औषधविक्रेत्याच्या भूमिकेत!

चार वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण केल्यानंतर डोव्हालवर कधीही काम करण्याची वेळ आली नाही.

संग्रहित छायाचित्र

 

थायलंडच्या क्लबचे प्रतिनिधित्व करणारा स्पेनचा फुटबॉलपटू टोनी डोव्हाल सध्या आपले फुटबॉलचे बूट फेकून औषधविक्रेत्याचा पांढरा कोट परिधान करून करोनावर मात करण्यासाठी सरसावला आहे.

२९ वर्षीय डोव्हाल थायलंडच्या क्लबकडून खेळत असून सध्या करोनाचा सामना करणाऱ्या आपल्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी स्पेनला रवाना झाला आहे. पण औषधविक्री करण्याचे शिक्षण घेत असलेला २९ वर्षीय डोव्हाल औषधविक्रेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. करोनामुळे स्पेनमध्ये हाहाकार उडला असताना डोव्हालने आपले फुटबॉलचे प्रेम जोपासण्याऐवजी आपल्या शिक्षणाचा फायदा जनतेला करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चार वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण केल्यानंतर डोव्हालवर कधीही काम करण्याची वेळ आली नाही.

‘‘स्पेनमधील परिस्थिती अधिकच बिकट बनल्यानंतर मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. जगातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आणि प्रवासबंदी असताना आपल्याला कामाचा व्यावहारिक अनुभव असावा, यासाठी मी औषधविक्रेता म्हणून काम करू लागलो,’’ असे डोव्हालने सांगितले.

स्पेनमध्ये ६४ हजारांहून अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली असून ४८०० पेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरदिवशी मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही शेकडोंच्या घरात आहे. ‘‘स्पेनमध्ये सध्या भयावह परिस्थिती असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणारा प्रत्येक जण बिथरलेला आहे. आमच्याकडे मदत मागण्यासाठी येणारेही प्रचंड घाबरले आहेत,’’ असे आपल्या कुटुंबीयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या डोव्हालने सांगितले.

स्पेनमध्ये सध्या मास्कचा तुटवडा जाणवत असून डोव्हाललाही मास्कशिवाय काम करावे लागत आहे. ‘‘करोनाशी लढा देताना आम्ही पूर्णपणे गुडघे टेकले आहेत. पण अशा परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. थर्मामीटर, गोळ्या, ग्लोव्हज् तसेच सॅनिटायझर्स यांसारख्या साध्या गोष्टींचीही कमतरता जाणवत आहे,’’ असे डोव्हालने सांगितले. डोव्हालने लेगानेस, रायो व्हॅलेकानो या स्पेनमधील अव्वल क्लब्सचे तसेच अमेरिकेतील स्पोर्टिग कनास सिटी आणि इंडियन सुपर लीगमधील बेंगळूरु एफसी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:33 am

Web Title: footballer dowal as pharmacist abn 97
Next Stories
1 ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणारच!
2 उरुग्वेच्या प्रशिक्षकांसह ४०० जणांना अर्धचंद्र
3 ऑलिम्पिक लांबणीमुळे अमेरिकेचे ९०५ कोटी रुपयांचे नुकसान
Just Now!
X