बुधवार, २२ मार्चच्या दिवशी जर्मनीतल्या प्रसिद्ध सिग्नल इडुना पार्कवर ८०,००० पेक्षा चाहत्यांचा जनसागर जमलेला. निमित्त होते इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीपूर्ण लढत. पण या गर्दीला भावनिक किनार लाभलेली. जर्मनीच्या ल्युकास पोडोलस्कीचा हा अखेरचा सामना होता. एका स्टँडमधल्या चाहत्यांनी ‘पोल्डी’ हे पोडोलस्कीचं टोपणनाव धारण केलं होतं. ‘वुई लव्ह पोडोलस्की’ असे शेकडो फलक फडकत होते. पोडोलस्कीची १० नंबरची जर्सी परिधान करुन हजारो चाहते त्याच्या नावाचा जयघोष करत होते. सामन्यापूर्वी पोडोलस्की संघासह सरावासाठी आला तेव्हा चाहत्यांनी जल्लोषी अभिवादन करत त्याचे स्वागत केलं. सामना सुरु होण्यापूर्वी पोडोलस्कीचा सत्कार करण्यात आला तेव्हाही संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाचा गजर करत होतं. भारावून टाकणाऱ्या प्रतिसादाने पोडोलस्कीच्या मनात आठवणींनी गर्दी केली. पण तो भावुक झाला नाही. ६९व्या मिनिटाला गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडत पोडोलस्कीने भन्नाट गोल केला आणि चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं. निर्धारित वेळ संपल्याची शिट्टी वाजली. स्टेडियममधल्या भव्य पडद्यावर घामाने डबडबलेला पोडोलस्की दिसू लागला. तेव्हा मात्र जर्मनीच्या कट्टर समर्थकांचे डोळे पाणावले. सहा फूट उंची, विस्तीर्ण कपाळ, सोनेरी केस, दाट भुवया, हिरवी झाक असलेले घारे डोळे, मोठ्ठं नाक आणि पाहताक्षणीच हा खेळाडू आहे हे स्पष्ट व्हावं अशी काटक शरीरयष्टी. दंड, कोपर टॅटूमय असलेल्या ३१ वर्षांच्या पोडोलस्कीने सामना संपल्यानंतर चाहत्यांच्या स्वाक्षरी, सेल्फी अशा सगळ्या प्रेमळ मागण्या पूर्ण केल्या. निवृती देहबोलीत दिसते असं म्हणतात. फुटबॉल विश्वातल्या ऊर्जामय खेळाडूंपैकी एक असलेल्या पोडोलस्कीच्या वावरात जराही शैथिल्य नव्हते. मात्र ‘आता थांबायला हवं’ हा निर्णय झाला होता. विक्रमांसाठी, आकडेवारीसाठी कधीही न खेळणाऱ्या पोडोलस्कीच्या १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सांगता मोहीम फत्ते करुनच झाली.

कोलाज हे जर्मनीच्या फुटबॉल संघाचे सार्वकालीन वैशिष्टय़. पिढी बदलते, वर्ष सरतात पण असंख्य गुणवान खेळाडूंचा ताफा असलेला जर्मनीचा संघ एकसंधच दिसतो. फुटबॉल सांघिक खेळ आहे हे जर्मनीच्या संघाकडे पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवतं. एक नायक आणि बाकी त्याचे अनुयायी अशी जर्मन संघाची संरचना कधीच नसते. आघाडीपटू, मध्यरक्षक, गोलरक्षक- प्रत्येकजण आपापल्या बालेकिल्यात माहीर असतो. परंतु त्या सगळ्यांना एकत्र केल्यावर सांघिक चेहरा तयार होतो. असंख्य नायक असूनही कोण्या एकाला मखरातलं स्थान दिलं जात नाही. विशेष म्हणजे चाहतेही एका विशिष्ट खेळाडूला डोक्यावर घेण्याऐवजी संपूर्ण संघाला समर्थन देतात. घोटीव व्यावसायिकता, अत्युच्य दर्जाचे कौशल्य, अफलातून तंदुरुस्ती यासह सगळ्यांनी मिळून जिंकायचं हे जर्मन संस्कृतीचं तत्व फुटबॉल संघातही अनुभवायला मिळतं. म्हणूनच जर्मनीचा संघ प्रत्येक मोठय़ा स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार असतो. आणि जरी पराभव पदरी पडला तरी कोण्या एकावर खापर फोडलं जात नाही. पोडोलस्कीचा जन्म पोलंडचा. जर्मन वाण त्याच्या अंगी असण्याचा विषयच नाही. परंतु जर्मनीत स्थलांतरित झाल्यावर पोडोलस्कीने जर्मनीची संस्कृती अंगीकारली. दोन्ही देशांचं नागरिकत्व असल्याने पोलंड की जर्मनी हा फैसला पोडोलस्कीला करायचा होता. पोलंड देश छोटा. फुटबॉल संस्कृतीही मर्यादित. पोलंडतर्फे खेळायचा निर्णय घेतला असता तर पोडोलस्कीचं आयुष्यच बदललं असतं. पोलंडचा महान खेळाडू म्हणून त्याचं नाव इतिहासात नोंदलं गेलं असतं. पोडोलस्कीने जर्मनीची निवड केली. १३ वर्षांनंतर जर्मनीच्या सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये पोडोलस्कीची गणना होणार नाही कदाचित पण धाडसी निर्णय घ्यायला मन घट्ट असावं लागतं. परिणामांची कल्पना असतानाही पोडोलस्कीने कठीण पर्यायाची निवड केली. जर्मनीच्या संघाचा निष्ठावान कार्यकर्ता ही भूमिका पोडोलस्कीने सदैव जपली. त्याच्या शेवटच्या सामन्यासाठी उपस्थित जनसागर पोडोलस्कीच्या आणि पर्यायाने खास जर्मन मूल्यांचं प्रतीक होतं.

२००६ मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी ही दिग्गज मंडळी पोरसवदा वयाची होती. त्यांच्या नावाचा ब्रँड प्रस्थापित व्हायचा होता. त्याचवर्षी सवरेत्कृष्ट युवा खेळाडू पुरस्काराने विश्वचषकात पोडोलस्कीला सन्मानित करण्यात आलं होतं. गोल करणं हे आघाडीपटूचं मुख्य काम. पण प्रत्येक गोल करणाऱ्याची पद्धत वेगळी असते. डाव्या पायाने प्रचंड शक्तीनिशी मात्र तरीही नेत्रदीपक गोल करणाऱ्या मोजक्या फुटबॉलपटूंमध्ये पोडोलस्कीचा समावेश होतो. लाँग रेज अर्थात दूरवरून चेंडूवर ताबा मिळवत त्याला खेळवत ठेवण्याऐवजी थेट गोलपोस्टमध्ये भिरकावणं पोडोलस्कीचं गुणवैशिष्टय़. पोडोलस्की खेळला तो सगळा कालखंड जर्मनीच्या फुटबॉल संघासाठी दैदिप्यमान असा होता. विश्वविजेतेपदासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य स्पर्धाची जेतेपदं जर्मनीने नावावर केली. मिरोस्लाव्ह क्लोस, फिलीप लॅहम, मेस्युट ओझील, मायकेल बलाक, जेरोम बोइटेंग, मारिओ गोइत्झे, टोनी क्रुस, गेरार्ड आणि थॉमस म्युलर, आंद्रे श्युरल असे एकापेक्षा एक आघाडीपटू असताना स्वत्व टिकवणे आव्हानात्मक आहे. अंतिम संघात स्थान पटकावण्यासाठी प्रचंड चुरस असताना पोडोलस्की जर्मनीच्या संघाचा नेहमीच अविभाज्य घटक होता. जर्मनीसाठी खेळताना १३० सामन्यांत ५१ गोल ही आकडेवारी पुरेशी बोलकी नाही. मात्र शेवटच्या लढतीत प्रशिक्षक जोअ‍ॅकिम लो यांनी पोडोलस्कीला कर्णधारपद देणं त्याचं योगदान अधोरेखित करणारं होतं. जर्मनीसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत पोडोलस्की तिसऱ्या स्थानी आहे.

जर्मनीसाठी मोलाच्या पोडोलस्कीला जगातल्या मातब्बर क्लब्सने ताफ्यात सामील करुन घेणं साहजिक होतं. तसं झालंही मात्र क्लबसाठी खेळताना पोडोलस्कीच्या भूमिकेत सातत्याने बदल करण्यात आले. संघाचा नियमित भागही नसायचा. एफसी कलोंज नावाच्या क्लबपासून पोडोलस्कीच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. क्लबस्तरीय फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या बायर्न म्युनिक क्लबचाही पोडोलस्की सदस्य होता. अर्सेनेल, इंटर मिलान आणि गालाटासराय इस्तंबूल या क्लब्सनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने वेळोवेळी तो सार्थही ठरवला. मात्र क्लब फुटबॉलपटू ही त्याची ओळख कधीही झाली नाही. क्लब का देश हा प्राधान्यक्रम ठरवणं भल्याभल्या फुटबॉलपटूंना ठरवणं कठीण होतं. पोडोलस्कीने जर्मनीच्या संघाला नेहमीच प्राधान्य दिले. पोलंडविरुद्ध खेळताना गोल केल्यावर पोडोलस्की आनंद साजरा करत नसे. ज्या देशात मी जन्मलो, त्या देशाचे माझ्यावर ऋण आहेत ही पोडोलस्कीची भूमिका असंख्य चाहत्यांना आपलंसं करणारी ठरली. क्रीडापटू युवा पिढीसाठी आदर्श होऊ शकतात. मैदानावर आणि मैदानाबाहेर आपलं वागणं नीटच असायला हवं यावर पोडोलस्कीने सदैव भर दिला. सहकारी.. श्रीमुखात लगावण्याचा प्रसंग सोडला तर पोडोलस्कीने हे तत्व जपलं. वडिलांकडून खेळाचा वारसा जपलेल्या पोडोलस्कीने रस्त्यावर रंगणाऱ्या फुटबॉल लढतींमधून कारकीर्दीला सुरुवात केली. सार्वजनिक वाहतुक यंत्रणेद्वारे क्लबपर्यंत पोहचून त्यानंतर खेळणं हा त्याचा शिरस्ता होता. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब यांचा मानकरी झाल्यानंतरही पोडोलस्की बदलला नाही. आपल्या मर्यादांची स्पष्ट जाण असलेला आणि सहकाऱ्यांच्या गुणवैशिष्टय़ांचा आदर करण्याच्या पोडोलस्कीच्या वृत्तीतून युवा खेळाडूंना शिकण्यासारखे खूप आहे अशी भावना प्रशिक्षक लो यांनी व्यक्त केली.  जर्मनीच्या सुवर्णमयी कालखंडाचे मानकरी असलेले बॅस्टिअन श्वाइनस्टायजर, मिरोस्लाव्ह क्लोस, फिलीप लॅहम या पर्वानी निवृत्तीचा मार्ग स्वीकारला. मैदानावरचा वेगवान वावर पोडोलस्कीची ओळख. रेंगाळणं त्याचा पिंड नाही. निवृत्तीचा त्वरेने घेतलेला निर्णयही पोडोलस्कीच्या वाटचालीला साजेसा असाच!

पराग फाटक

parag.phatak@expressindia.com