*  भारताचा इंग्लंडवर सात विकेट राखून विजय
*  जडेजाचा प्रभावी मारा तर कोहलीची विराट खेळी
*  भारताची मालिकेत २-१ अशी अशी आघाडी
रवींद्र जडेजा याच्यासह भारताच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीपाठोपाठ विराट कोहलीने केलेले नाबाद अर्धशतक यामुळेच भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा एक दिवसीय क्रिकेट सामना सात गडी राखून जिंकला. या विजयामुळे भारतास पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळाली.
जडेजा (३/१९), रवीचंद्रन अश्विन (२/३७) व इशांत शर्मा (२/२९) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा डाव ४२.२ षटकांत १५५ धावांमध्ये गुंडाळला. हे आव्हान भारतास फारसे अवघड नव्हते. बऱ्याच दिवसांनी सूर गवसलेल्या कोहलीने आत्मविश्वासाने खेळ करीत नाबाद ७७ धावा करीत संघाचा विजय सुकर केला. भारताने २८.१ षटकांतच १५७ धावा करीत झारखंड क्रिकेट संघटनेच्या नवीन स्टेडियमवर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला घरच्या मैदानावर अतिशय महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.
गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि अपेक्षेप्रमाणे धोनीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथमपासूनच खेळाचे फासे धोनीच्या अपेक्षेनुसारच पडत गेले. सुरुवातीस भुवनेश्वरकुमार, शमी अहमद व इशांत शर्मा यांनी गडी बाद करण्याबरोबरच धावाही रोखून ठेवण्याची कामगिरी पार पाडली. त्यामुळेच की काय इंग्लंडकडून मोठी भागीदारी झाली नाही. इयान बेल (२५), जो रुट (३९) व शेवटच्या फळीत टीम ब्रेसनान (२५) यांचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज भारताच्या द्रुतगती व फिरकी गोलंदाजीसमोर फार वेळ टिकला नाही. रुट व ब्रेसनान यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या ४७ धावा हीच त्यांच्याकडून झालेली सर्वात मोठी भागीदारी होती. द्रुतगती गोलंदाजांचा वारसा पुढे ठेवीत जडेजा व अश्विन यांनी इंग्लंडच्या मधल्या व शेवटच्या फळीतील फलंदाजांची दाणादाण उडविली. एकाच षटकांत दोन विकेट्स घेणाऱ्या जडेजाने केवळ १९ धावांमध्ये तीन बळी घेतले. अश्विनने ३७ धावांमध्ये दोन बळी मिळविले. इशांत शर्माने २९ धावांमध्ये दोन गडी बाद केले. धोनीने कल्पकतेने गोलंदाजीत बदल घडवित इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्याने यष्टीमागे तीन झेल घेत गोलंदाजांना यथार्थ साथ दिली.
विजयासाठी भारतापुढे आव्हान सोपे होते तरीही भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे हा खाते उघडण्यापूर्वीच स्टीव्हन फिन याच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर कोहलीने गंभीरच्या साथीत आश्वासक खेळ करीत ६७ धावांची भर घातली. गंभीरला सूर गवसला असे वाटत असतानाच गंभीर ३३ धावांवर तंबूत परतला. गंभीरच्या जागी आलेल्या युवराजसिंगने कोहलीस झकास साथ दिली. या जोडीने मनमुराद फटकेबाजी करीत संघास विजयाच्या दृष्टिपथात आणले. त्यांनी ६६ धावांची भागीदारी केली. कोहलीने सहजसुंदर फटकेबाजी करताना एक दिवसीय कारकीर्दीतील चार हजार धावांचा टप्पा ओलांडला. एक दिवसीय कारकीर्दीतील २२ वे अर्धशतकही त्याने टोलविले. संघास विजयासाठी केवळ १२ धावा बाकी असताना युवराज बाद झाला. त्याने ३० धावा केल्या.
कोहलीने त्यानंतर धोनीच्या साथीत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने ७९ चेंडूंमध्ये नाबाद ७७ धावा करताना नऊ चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजीही केली. सामनावीर किताबाचा तोच मानकरी ठरला.
गोलंदाजांची सुरेख कामगिरी-धोनी
संघाच्या विजयाचे मुख्य श्रेय गोलंदाजांना आहे. त्यांनी इंग्लंडला १६० धावांपूर्वीच गुंडाळले आणि फलंदाजांचे काम सोपे केले. जडेजा व अश्विन यांनी सुरेख गोलंदाजी केली. गंभीर व कोहली यांनीही आत्मविश्वासाने फलंदाजी केली. एकूणच सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्हास हा विजय मिळविता आला असे भारताचा कर्णधार धोनी याने सामन्यानंतर सांगितले.
फलंदाजांनी निराशा केली-कुक
खेळपट्टी गोलंदाजीस पोषक होती तरीही दीडशे धावांमध्ये डाव आटोपण्याइतकी आमची फलंदाजीची बाजू कमकुवत नाही. मात्र येथे फलंदाजांनी सपशेल निराशा केली. किमान २२५ धावांचा टप्पा गाठण्याचे आमचे ध्येय होते. भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली असे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने सांगितले.
धावफलक
इंग्लंड- अ‍ॅलिस्टर कूक पायचीत गो. शमी अहमद १७, इयान बेल झे.धोनी गो.कुमार २५, केविन पीटरसन झे.धोनी गो.शर्मा १७, जो रुट झे.धोनी गो.शर्मा ३९, इऑन मोर्गन झे.युवराज गो. अश्विन १०, क्रेग कीस्वेटर त्रि.गो.जडेजा ०, समीत पटेल पायचीत गो.जडेजा ०, टीम ब्रेसनान त्रि.गो.अश्विन २५, जेम्स ट्रेडवेल नाबाद ४, स्टीव्हन फिन झे.युवराज गो. रैना ३, जेड डर्नबॅच त्रि.गो. जडेजा ०,
अवांतर (लेगबाईज ६, वाईड ९) १५,
एकूण ४२.२ षटकांत सर्वबाद १५५
बाद क्रम-१/२४, २/६८, ३/६८, ४/९७, ५/९८, ६/९८, ७/१४५, ८/१४५, ९/१५५
गोलंदाजी-भुवनेश्वरकुमार- १०-२-४०-१, शमी अहमद ८-०-२३-१, इशांत शर्मा ७-०-२९-२, रवींद्र जडेजा ६.२-०-१९-३, रवीचंद्रन अश्विन १०-०-३७-२, सुरेश रैना १-०-१-१.
भारत- गौतम गंभीर झे.रुट गो. ट्रेडवेल ३३, अजिंक्य रहाणे त्रि.गो. फिन ०, विराट कोहली नाबाद ७७, युवराजसिंग त्रि.गो. ट्रेडवेल ३०, महेंद्रसिंह धोनी नाबाद १०, अवांतर (बाईज १, लेगबाईज १, वाईड ५) ७, एकूण २८.१ षटकांत ३ बाद १५७.
बाद होण्याचा क्रम-१/११, २/७८, ३/१४४.
गोलंदाजी- स्टीव्हन फिन ९.१-०-५०-१, जेड डर्नबॅच ५-०-४५-०, टीम ब्रेसनान ७-२-३१-०, जेम्स ट्रेडवेल ७-१-२९-२.