पर्थ येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजच सामन्याचा निकाल ठरवणार आहेत. या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाजी मिचेल जॉन्सनने मिचेल स्टार्कला मार्गदर्शन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

अ‍ॅडलेडच्या कसोटीमध्ये स्टार्कने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. या कसोटीत भारताने ३१ धावांनी विजय मिळवला होता. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या जॉन्सनने आगामी कसोटी सामन्याच्या दृष्टिकोनातून म्हटले आहे की, ‘‘स्टार्कला याआधी मी बऱ्याचदा मार्गदर्शन केले आहे. गेल्या काही दिवसांत त्याला मोबाइलवर संदेश पाठवून मार्गदर्शनाची तयारी दर्शवली आहे. कारण पर्थची खेळपट्टी ही वेगवान आणि उसळणारी आहे.’’

गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत स्टार्कने आठ सामन्यांत ३२.६२च्या सरासरीने २९ बळी मिळवले आहे. याच कालखंडात नॅथन लायन (१० सामन्यांत ४६ बळी), पॅट कमिन्स (८ सामन्यांत ४० बळी) आणि जोश हॅझलवूड (८ सामन्यांत ३० बळी) अधिक बळी मिळवले आहेत.