भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आलेले एन. श्रीनिवासन संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात का, याबाबत स्पष्टीकरण मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारीला दिलेल्या सुनावणींतर्गत श्रीनिवासन यांना कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या श्रीनिवासन यांच्याबाबत कायदेशीर सुस्पष्टता यावी, यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
कोलकाता येथे २८ ऑगस्टला बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र श्रीनिवासन यांच्या उपस्थितीबाबत काही सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे ती स्थगित करण्यात आली. या वेळी श्रीनिवासन यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी सभेला हजर राहू शकतो, असे श्रीनिवासन यांनी सांगितले होते. तसेच श्रीनिवासन बैठकीला हजर राहू शकतात, असे न्यायमूर्ती श्री कृष्णा यांचे मतसुद्धा त्यांनी मांडले.