पुढील पाच वर्षे (२०२१ ते २०२५) प्रो कबड्डी लीगचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. मशाल स्पोर्ट्सने केलेल्या ई-लिलावात प्रतिस्पर्धी आव्हानच नसल्याने डिस्ने स्टार इंडियाला प्रसारण हक्क बिनविरोधपणे प्राप्त झाले.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीमुळे मशाल स्पोर्ट्सला शुक्रवारी प्रो कबड्डीच्या प्रसारण हक्काची निविदा प्रक्रिया पूर्ण करता आली. देशातील लोकप्रियत लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या प्रो कबड्डी लीगच्या प्रसारण हक्काकरिता स्टार स्पोर्ट्सने प्रत्येक वर्षांसाठी १८० कोटी म्हणजेच पाच वर्षांसाठी एकूण ९०० कोटी रुपयांची बोली निविदेत मांडली होती, असे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.

यंदा प्रथमच मशाल स्पोर्ट्सने प्रसारण हक्कासाठी खुली निविदा प्रक्रियेचा अवलंब केला. तसेच ९०० कोटी रुपये मूळ किंमत निश्चित केली होती. ई-लिलाव प्रक्रियेमधील प्रसारण हक्कात जागतिक टीव्ही प्रक्षेपण, देशातील डिजिटल हक्क, गेमिंग हक्क आणि एकत्रित हक्क यांचा समावेश आहे. स्टार इंडियाने आधीच ‘ड्रीम ११’शी गेमिंग भागीदारी केली आहे.

‘‘स्वतंत्र लिलाव समितीने ही लिलाव प्रक्रिया पार पाडली. आता प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाकडे आम्ही गांभीर्याने पाहात आहोत,’’ असे प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.