ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले, अशी माहिती स्टार इंडियाने एका पत्रकाद्वारे दिली.

“डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत”, असे स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले.

“डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील”, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली.