चॅपेल यांची सूचना

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी पायचीतच्या नियमांमध्ये बदल सुचवले आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर यष्टय़ांचा वेध घेत असेल आणि पॅडवर आदळला तर फलंदाजाला पायचीत बाद ठरवावे, अशी सूचना चॅपेल यांनी केली आहे.

‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला थुंकी किंवा लाळेने घासण्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आक्षेप घेतला असला तरी चेंडूला स्विंग करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल, यावर कर्णधारांचे एकमत असणे गरजेचे आहे. पायचीतचे नवे नियम सोपे असायला हवेत. चेंडू बॅटला स्पर्श न करता पॅडवर आदळला आणि तो थेट यष्टय़ांवर जात असेल तर पंचांनी फलंदाजाला बाद ठरवावे. चेंडू योग्य दिशेने जात आहे की नाही, पॅडवर योग्य रितीने आदळला आहे की नाही किंवा चेंडू यष्टय़ांचा वेध घेत आहे की नाही, हे आता ध्यानात घेऊ नये,’’ असे चॅपेल यांनी सुचवले आहे.

‘‘पायचीतच्या या नव्या नियमांवर फलंदाजांकडून टीका होऊ शकते, पण क्रिकेट हा खेळ अधिक पारदर्शक करणे गरजेचे आहे. गोलंदाज जर यष्टय़ांचा वेध घेऊन गोलंदाजी करत असेल तर फलंदाजाला बॅटच्या साह्य़ाने आपला बळी कायम ठेवावा लागणार आहे. पॅड हे फक्त आपला बळी वाचवण्यासाठी नव्हे तर दुखापतीपासून रक्षण करण्यासाठी वापरले जावेत,’’ असेही ७६ वर्षीय इयान चॅपेल यांनी सुचवले आहे.