या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निवड समितीचा अध्यक्ष बदलला आहे. आता ट्रेव्हर होन्स ऐवजी जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियन संघ निवडण्यासाठी निवड समितीचा अध्यक्ष असेल. तो टी-२० विश्वचषक आणि अॅशेस मालिकेसाठी संघ निवडेल. बेलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकूण १२५ सामने खेळले आहेत. दोन वर्षांपूर्वी तो निवड समितीचा एक भाग झाला आणि आता त्याला बढती देण्यात आली आहे.

होन्स हे २१ वर्षे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य होते. या दरम्यान ते १६ वर्षे अध्यक्ष होते. १९९१ ते २००५ या काळात त्यांनी पहिल्यांदा ही जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर २०१६ पासून ते आतापर्यंत या पदावर होते. नव्या जबाबदारीबद्दल बेली म्हणाला, ”मला ट्रेव्हर यांच्या अविश्वसनीय कार्याबद्दल आभार मानायचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ बराच यशस्वी झाला. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणूनही मी त्याच्या प्रवासाचा एक भाग होतो. एवढे आव्हानात्मक काम असूनही, ट्रेव्हर नेहमी शांत राहिले. त्यांनी माझा खेळाडूपासून अध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवासही सोपा केला. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे आणि ही जबाबदारी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे.”

 

हेही वाचा – Tokyo 2020 : सात टाके पडल्यानंतरही वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

ट्रेव्हर होन्स यांची यशस्वी कारकीर्द

ट्रेव्हर होन्स हे १९८९मध्ये अॅशेस मालिका जिंकणाऱ्या संघाचे एक सदस्य होते. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, ऑस्ट्रेलियन संघाने सलग पाच अॅशेस मालिका जिंकल्या. याशिवाय १९९९ आणि २००३ मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकण्यातही संघ यशस्वी झाला. त्यांची दुसरी टर्मही चमकदार होती. त्यामुळे आता नवीन अध्यक्ष म्हणून बेलीसाठी मोठे आव्हान असेल. टी-२० विश्वचषक आणि अॅशेस मालिकेसाठी संघ निवडणे ही त्याची पहिली मोठी चाचणी असेल.

बेलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी एकूण १२५ सामने खेळले. यामध्ये त्याने ३७०० धावा केल्या. यादरम्यान, त्याने तीन शतके देखील केली. ऑस्ट्रेलियासाठी ५७ सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या बेलीने संघाला ३० विजय मिळवून दिले आहेत.