भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून टी२० मालिका बरोबरीत सोडवण्यात भारताला यश आले. या मालिकेदरम्यान शिखर धवन, रोहित शर्मा या दोघांनी आपली चमक दाखवून दिली. पण भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या खेळीच्या जोरावर भारताला सामना जिंकून दिला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट कोहलीला रोखायचे असेल तर त्याच्यावर बाऊन्सरचा भडीमार करण्याचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयन चॅपल यांनी दिला आहे.

विराट कोहली हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला चिथवण्याचा किंवा चिडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच्यावर बाऊन्सरचा भडीमार करा, असा सल्ला चॅपेल यांनी दिला आहे. चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ शाब्दिक चकमकीबाबत काहीसा शांत दिसू शकतो. पण असे असले तरी गोलंदाजीत मात्र त्यांनी आक्रमक राहायला हवे. स्लेजिंग केले नाही तरीही ठीक आहे, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बाऊन्सर चेंडू टाकण्याबाबत अजिबात तडजोड करू नये, असे ते म्हणाले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखण्याची भारताने चूक करू नये, असे सूचक वक्तव्य चॅपलने केले. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क असे वेगवान गोलंदाजांचे त्रिकुट आहे. स्मिथ, वॉर्नर आणि हॅंड्सकोम्ब हे तीन खेळाडू निलंबित असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर परिणाम होईल असे माहिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गोलंदाज अधिक चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक केला.