ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटींग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. पाँटींगने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वविजेतेपद मिळवून दिलं आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाँटींगच्या नावावर ७१ शतकांसह २७ हजारांपेक्षा जास्त धावा जमा आहेत. २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर पाँटींग प्रशिक्षणाकडे वळला होता. ऑस्ट्रेलियन संघाला प्रशिक्षण देण्यापासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांनाही पाँटींगने प्रशिक्षण दिलं आहे.

यानंतर रिकी पाँटींगने आता दारुचा व्यवसाय सुरु केला आहे. रिकी पाँटींगने वाईनचा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं असून पाँटींगने स्वतःच्या नावाची वाईन बाजारात आणली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाँटींगने याबद्दल माहिती दिली.

ऑस्ट्रेलियातल्या सर्वोत्तम वाईन निर्मात्या बेन रिग्जसोबत काम करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा नवीन व्यवसाय सुरु करताना आम्ही प्रचंड उत्सुक आहोत अशी प्रतिक्रीया पाँटीगने यावेळी व्यक्त केली.

पाँटींगने त्याच्या कारकिर्दीत १६८ कसोटी सामने खेळले असून यात ५१.८५ च्या सरासरीने १३३७८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४१ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ३७५ वनडे सामने खेळताना ४२.०३ च्या सरासरीने १३७०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३० शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने १७ टी२० सामने खेळले असून २ अर्धशतकांसह ४०१ धावा केल्या आहेत.