ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जेसन गिलेस्पीकडून कौतुक

अ‍ॅडलेड : महेंद्रसिंग धोनीकडे परिस्थितीनुसार खेळात आवश्यक ते बदल करण्याची कला असून त्यामुळेच तो आजही भारताला अनेक सामने जिंकवून देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जेसन गिलेस्पीने बुधवारी व्यक्त केली.

मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने नाबाद अर्धशतक झळकावताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. धोनीने पुन्हा एकदा सामना संपवण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. याविषयी विचारले असता गिलेस्पी म्हणाला, ‘‘धोनी संघात असल्यामुळे भारताला मागील दशकापासून अनेक फायदे झाले आहेत. तसेच आताही त्याचाच लाभ भारताला होत आहे. अनुभवाच्या बळावर धोनी परिस्थितीनुरूप खेळ करतो. कधी संथगतीने खेळायचे व कधी धावगती वाढवायची, याची योग्य समज धोनीइतकी कोणालाच असू शकत नाही.’’

‘‘सिडनीतील सामन्यात तो काहीसा संथगतीने खेळला, मात्र संघाची अवस्थाच इतकी बिकट होती की धोनीला तसे खेळणे क्रमप्राप्त होते. त्याउलट अ‍ॅडलेड येथे दडपणाखालीदेखील त्याने सुरुवातीला कोहलीसह डाव सावरला व तो बाद झाल्यानंतर स्वत: पुढाकार घेत संघाला विजयी रेषा ओलाडूंन दिली. त्याला ३००हून अधिक सामन्यांचा अनुभव आहे, त्यामुळे आपण त्याला शिकवण्याची गरजच नाही,’’ असेही गिलेस्पीने सांगितले.

भारताच्या मध्यक्रमाविषयी विचारले असता गिलेस्पी म्हणाला, ‘‘भारताला सध्या तरी मध्यक्रमात बदल करण्याची काहीच आवश्यकता आहे. अंबाती रायुडू चांगला फलंदाज असून त्याला चौथ्या क्रमांकावर आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे धोनीने पाचव्या व दिनेश कार्तिकने सहाव्या क्रमांकावरच फलंदाजीस यावे. तसेच फक्त कोहलीवर अवलंबून न राहता संघातील इतर फलंदाजांकडेदेखील सामना जिंकवण्याची क्षमता आहे, असे मला वाटते.’’

भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार!

वेगवान गोलंदाजांची सर्वोत्तम फळी भारताकडे उपलब्ध असल्यामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी भारत प्रबळ दावेदार आहे, असे गिलेस्पी म्हणाला. तो म्हणाला, ‘‘जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी व खलिल अहमद हे संभाव्य १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळवतील. या चौघांकडेही वेग व चेंडूचा अचूक टप्पा राखण्याची कला असल्यामुळेच विश्वचषक पटकावण्याची भारताला सर्वाधिक संधी आहे.’’