माजी फलंदाज सुनील गावस्कर यांना विश्वास

सध्याचा भारतीय कसोटी संघ कोणत्याही संघाविरुद्ध विश्वातील आव्हानात्मक खेळपट्टीवरही वर्चस्व गाजवू शकतो, असे मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी शनिवारी व्यक्त केले. त्याशिवाय आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारताचेच पारडे जड आहे, असे गावस्कर यांना वाटते.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साऊदम्पटन येथे ही अंतिम लढत खेळवली जाणार आहे. ‘‘गेल्या काही वर्षांत भारताच्या कसोटी संघाने उत्तुंग भरारी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या यशाचे प्रामुख्याने श्रेय जाते. संघातील प्रत्येक खेळाडूत कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची भारतालाच सर्वोत्तम संधी आहे,’’ असे गावस्कर म्हणाले.

सिराजला अंतिम संघात स्थान मिळणे कठीण -आगरकर

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान मिळणे कठीण आहे, असे मत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केले. ‘‘इंग्लंडच्या खेळपट्ट्यांचा अंदाज घेता जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या तिघांनाच वेगवान गोलंदाज म्हणून प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सध्या सर्वोत्तम लयीत असूनही सिराजला संघाबाहेर बसावे लागेल, असे मला वाटते. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंचे अष्टपैलू योगदान महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्यापैकी एकाला डावलणेही चुकीचे ठरेल,’’ असे आगरकर म्हणाला.