मुंबईचे माजी रणजीपटू रंजन बैंदूर यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते.
ऑफ-स्पिनर आणि मधल्या फळीतील फलंदाजी ही त्यांची वैशिष्टय़े होती. टाटा स्पोर्ट्स क्लबचे ते माजी सचिव होते. बैंदूर मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. १९७४-७५ ते १९८४-८५ या कालखंडात बैंदूर यांनी १६ सामन्यांत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. ३७.२०च्या सरासरीने २० बळी मिळवले. ३२ धावांत ४ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी. याचप्रमाणे १९.७५च्या सरासरीने ३१६ धावा त्यांच्या खात्यावर आहेत. त्यांनी ९६ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती.
‘‘सोमवारी सकाळी बैंदूर यांच्यावर अँजियोग्राफी करण्यात येणार होती. सकाळी कॉफी घेतल्यानंतर शौचालयाला गेले असताना ते तिथेच कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली,’’ अशी माहिती माजी क्रिकेटपटू रवी ठक्कर यांनी दिली.