07 July 2020

News Flash

करोनानंतरच्या काळात खेळाडूंनी नियमांचे पालन करणे आवश्यक!

क्रीडा खात्याने नवे नियम आखले असून खेळाडूंनी त्यांचे पालन करणे गरजेचे आहे

चंद्रकांत पंडित, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : करोनानंतरच्या काळात साहजिकपणे क्रीडाविश्वात अनेक बदल घडून आले आहेत. परंतु खेळाडूंच्याच सुरक्षेसाठी शासनाने तसेच क्रीडा खात्याने नवे नियम आखले असून खेळाडूंनी त्यांचे पालन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यांपासून जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद होत्या. परंतु आता जर्मनी, कोरिया येथे फुटबॉल स्पर्धाना सुरुवात झाली असून भारतातही लवकरच क्रीडा सामन्यांना प्रारंभ होईल, असे पंडित यांना वाटते. मात्र यापुढील काळात खेळाडूंना स्वत:वर अधिक नियंत्रण ठेवून प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय खेळण्याची सवय करून घ्यावी लागेल, असे मतही विदर्भाला दोन वेळा रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या पंडित यांनी मांडले. एकंदर क्रीडा क्षेत्रातील अपेक्षित बदल आणि खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व यासंबंधी पंडित यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

’ भारतातील क्रीडा क्षेत्र कधीपर्यंत सुरू होईल, असे तुम्हाला वाटते?

भारतातील सध्याची परिस्थिती पाहता किमान ऑगस्ट महिन्यापर्यंत क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, असे मला वाटते. परंतु करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच राहिल्यास क्रीडा स्पर्धाचे पुनरागमन लांबूही शकते. देशासाठी प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धापेक्षा प्रथम स्थानिक स्पर्धा सुरू करण्यावर लक्ष के ंद्रित करावे. त्याचप्रमाणे इतक्या महिन्यांच्या विश्रांतीनंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी थेट मैदानावर उतरणे क्रिकेटपटूंसाठी सोपे नसेल. त्यापूर्वी त्यांना पुरेसा सराव मिळणे आवश्यक आहे.

’ करोनानंतरच्या काळात क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनेक बदल दिसतील, त्याविषयी तुमचे काय मत आहे?

‘जंगल में मोर नाचा, किसने देखा?’ हिंदीतील या म्हणीप्रमाणे जर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजाने शतक झळकावले अथवा गोलंदाजाने हॅट्ट्रिक मिळवूनही त्याचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी एकही चाहता स्टेडियममध्ये उपस्थित नसेल, तर काय फायदा? ज्यावेळी प्रेक्षक स्टेडियममध्ये खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी येतात, तेव्हाच तो खेळाडू मोठा होतो. कदाचित टीव्हीवरून त्याला असंख्य दर्शक पाहत असतील. मात्र स्टेडियममध्ये आपल्या नावाचा जयघोष होत असताना चमकदार कामगिरी करण्याचा अनुभव निराळाच असतो. मात्र सुरुवातीचे काही महिने तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशबंदी असेल, असे मला वाटते. त्यामुळे खेळाडूंना आता प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय खेळण्याची सवय करावी लागेल. त्याचप्रमाणे चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करणे, यामागे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एकप्रकारे स्वार्थ लपलेला असतो. मात्र आता क्रिकेटपटूंनी स्वार्थाकडे दुर्लक्ष करून आरोग्याच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे भान राखण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल, असे मला वाटते.

’ प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

कोणत्याही क्रीडापटूसाठी या काळात शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा मानसिक संतुलन राखणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. सध्या मी खेळाडूंशी संवाद साधण्याबरोबरच फिजिओ आणि वैद्यकीय चमूलासुद्धा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे सुचवत आहे. या काळात खेळाडूला स्वत:चे आत्मपरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे खेळाडूने या काळाचा भविष्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल, याकडे लक्ष द्यावे.

’ विश्वचषक आणि ‘आयपीएल’च्या आयोजनाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तुम्हाला कोणत्या स्पर्धेच्या आयेजनाची शक्यता अधिक वाटते?

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळली जावी, असेच मला वाटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी योग्य तो निर्णय घेईलच. परंतु चाहत्यांमध्ये विश्वचषकाविषयी नेहमी अधिक उत्सुकता असते. ‘आयपीएल’ विश्वचषकापूर्वी अथवा त्यानंतरच्या काळात आयोजित करता येऊ शकते. परंतु शक्य असेल तर विश्वचषक खेळण्यालाच प्राधान्य द्यावे.

’ महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाविषयी तुमचे काय मत आहे?

खरेतर धोनी हा इतका महान खेळाडू आहे की त्याच्या भवितव्याविषयी मी अथवा आपण कोणीही मत व्यक्त करणे चुकीचे ठरेल. प्रत्येक खेळाडूला ठरावीक काळानंतर कुठे थाबांयचे, हे ठाऊक असते. धोनीसाठी पुनरागमन करणे कठीण असले तरी त्याची शारीरिक तंदुरुस्ती अद्यापही कमालीची आहे. त्यामुळे तो इतक्या सहज निवृत्ती पत्करेल, असे मला वाटत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 2:45 am

Web Title: former cricketer and coach chandrakant pandit interview for loksatta zws 70
Next Stories
1 खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटची शिफारस
2 अमेरिकन टेनिस स्पर्धा झाल्यास अनेक निर्बंध अपेक्षित
3 बुंडेसलिगा फुटबॉल : बायर्नच्या विजयात लेव्हानडोवस्की चमकला
Just Now!
X