आठवडय़ाची मुलाखत : अंजूम चोप्रा, माजी क्रिकेटपटू

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही वर्षांत आपल्या कामगिरीचा दर्जा कमालीचा उंचावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची जगातील अव्वल संघांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता नक्कीच आहे, असे मत भारताची माजी क्रिकेटपटू आणि आता समालोचनाकडे वळलेली अंजूम चोप्रा हिने व्यक्त केले.

२०१७च्या विश्वचषकात भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली, तर २०२०च्या ट्वेन्टी—२० विश्वचषकात भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाचे भवितव्य खूपच उज्ज्वल असल्याचे अंजूमने नमूद केले. भारतीय संघाच्या आगामी वाटचालीविषयी अंजूमशी केलेली ही बातचीत—

> करोना साथीचा काळ महिला क्रिकेटपटूंसाठी कितपत आव्हानात्मक आहे?

करोनाचा काळ संकटाचा असला तरी यापुढे खेळाडूंना मैदानात पुनरागमन करणे मानसिकदृष्टय़ा कठीण असेल. क्रिकेटच खेळले नाही तर सामन्याची खरी रंगत अनुभवता येणार नाही. सध्या खेळाडूंमध्ये एकप्रकारची शिथिलता आली असेल. त्यामुळे सामन्यासाठीची तंदुरुस्ती राखणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. येणाऱ्या काळात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तरच देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याची चिन्हे आहेत. भारतीय संघातील काही जणी गेल्या वर्षी शेवटचा एकदिवसीय सामना खेळल्या आहेत. काहींनी पाच महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी—२० सामना खेळला आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले जात नाही, तोपर्यंत त्यांना तंदुरुस्ती राखणे कठीण जाणार आहे. क्रिकेटपटूंनी घरच्या घरी हलकासा व्यायाम करावा, जेणेकरून त्यांना पुनरागमन करणे थोडेसे सोपे जाईल.

> पुढील आठवडय़ापासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चॅलेंजर स्पर्धेत उतरणे महिला क्रिके टपटूंसाठी कितपत आव्हानात्मक असेल?

तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर महिला क्रिकेटपटूंचा खेळ पाहायला मिळणार, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. गेल्या दोन—तीन वर्षांपासून चॅलेंजर स्पर्धेचा दर्जा कमालीचा उंचावला आहे. त्या दर्जाचा खेळ यंदा करण्यासाठी खेळाडूंना कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याच्या तयारीसाठी महिला क्रिकेटपटूंकडे सव्वा महिन्याचा कालावधी असेल. त्यामुळे चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी महिला क्रिकेटपटूंवर असेल. प्रेक्षक नेहमीच चांगल्या दर्जाचे क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी महिला क्रिकेटपटूंना जोमाने प्रयत्न करावे लागतील.

> विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भारतीय संघाला अद्याप साकारता आलेले नाही, याविषयी काय सांगशील?

भारतीय महिला संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी कमालीची सुधारली आहे. २०१७चा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०२०च्या ट्वेन्टी—२० विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारून भारताला विश्वचषकाने हुलकावणी दिली. पण या दोन्ही सामन्यांत भारतीय संघ मोठय़ा फरकाने पराभूत झाला आहे, हे विसरून चालणार नाही. कोणतीही विश्वचषक स्पर्धा सहजपणे जिंकता येत नाही. त्यासाठी त्या दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी यांसारखे सर्वात अनुभवी खेळाडू भारतीय संघात आहेत, त्यांच्या नावापेक्षा त्यांना अधिक संधी द्यायला हवी. त्याचबरोबर हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, एकता बिश्त आणि दीप्ती शर्मा यांसारख्या सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंसह जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा या युवा खेळाडूंचाही संघात समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकाचे स्वप्न लवकरच साकार होईल, असे मला वाटते.

> हरमनप्रीत, स्मृती आणि जेमिमा यांच्याविषयीचे तुमचे विश्लेषण काय आहे?

तिघीही चांगल्या खेळाडू असून भारताचे भवितव्य मानल्या जातात. हरमनप्रीत आणि स्मृती बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा अनुभव गाठीशी आहे. पदार्पण केल्यापासून हरमनप्रीत चांगली कामगिरी करत असून भारतीय संघाला सामने जिंकून देत आहे. तिच्यातील प्रतिभा, सातत्यपूर्ण कामगिरी आणि क्षमता वाखाणण्याजोगी आहे. स्मृती मानधनाने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जगात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती एक चांगली फलंदाज आहे. तसेच जेमिमाला अद्याप आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी—२० सामन्यांमध्ये तिला अधिक संधी देऊन तिच्यातील कलागुण उभारण्याची संधी द्यायला हवी. संधीचे सोने केल्यानंतरच तिला सामना जिंकून देणारी खेळाडू ही उपमा देता येईल. त्याआधी एक युवा खेळाडू म्हणूनच तिच्याकडे पाहायला हवे.

> आगामी भारत—ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तू समालोचकाच्या भूमिकेत दिसशील, त्याविषयी काय सांगशील?

याआधी इंग्लंड—ऑस्ट्रेलिया मालिकेचे थेट समालोचन करण्याची संधी मला मिळाली होती. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय़ संघांमधील सामन्याचे शब्दश: वर्णन चाहत्यांपर्यंत पोहोचवून त्यांची मने जिंकण्याची संधी मला मिळाली आहे. ही संधी दिल्याबद्दल मी सोनी वाहिनीचे आभार मानते. या मालिकेच्या समालोचनासाठी मी आतुर असून आपले काम चोखपणे पार पाडण्यासाठी मी मेहनत घेत आहे.