मनोज तिवारी यानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हुगळी येथील मोर्चात टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही तासानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा यानेही राजकारणात प्रवेश केला आहे. बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा यानं आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

अशोक दिंडाने आज, बुधवारी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अशोक दिंडानं भाजपातून आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष सोडून अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर काही नवीन चेहरेही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत.

३६ वर्षीय दिंडा यानं नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. दिंडा यानं १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अशोड दिंडाच्या नावावर ४२० विकेट आहेत. दिंडा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अखेरचा खेळला आहे. या स्पर्धेत तो तीन सामने खेळला आहे.