आठवडय़ाची मुलाखत : दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

प्रशांत केणी, मुंबई</strong>

क्रिकेट हा सांघिक खेळ असल्यामुळे करोनावरील लस येईपर्यंत खेळणे खेळाडूंसाठी धोकादायक ठरेल, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

‘‘मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणी समितीने ऐतिहासिक बोधचिन्ह (लोगो) बदलण्याऐवजी येत्या हंगामाचा गांभीर्याने विचार करावा. या रिक्त कालावधीत सर्व वयोगटांच्या हंगामाची योग्य आखणी करता येऊ शकते. निवड समिती, प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शकांची नेमणूकसुद्धा आता करता येऊ शकते,’’ असा सल्ला वेंगसरकर यांनी दिला. करोनामुळे क्रिकेटपुढे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत वेंगसरकर यांच्याशी केलेली खास बातचीत –

* भारताच्या क्रिकेट हंगामाविषयी तुम्ही काय सांगाल?

करोनाची साथ ऑगस्टपर्यंत तरी आटोक्यात येईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आव्हान भारतासमोर असेल. मग ‘आयपीएल’सुद्धा खेळवता येऊ शकेल. देशांतर्गत हंगामाविषयी सांगायचे तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दुलीप करंडक, मुश्ताक अली यांच्यासारख्या स्पर्धा दक्षिणेत खेळवता येतील. जेणेकरून नव्या निवड समितीला संघबांधणीसाठी उत्तम पर्याय मिळतील.

* येत्या काही दिवसांत वेस्ट इंडिज संघ इंग्लंडशी कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये जैवसुरक्षित स्टेडियम उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. याविषयी तुमचे काय मत आहे?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जैवसुरक्षित स्टेडियमची व्यवस्था असू शकते. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांविना सुरक्षित वातावरणात पार पडू शकेल. या दोन्ही देशांत करोनाची साथ नियंत्रणात आहे. न्यूझीलंड हा देश तर पूर्णत: सुरक्षित आहे.

* येत्या काही महिन्यांत होणारे प्रेक्षकांविना सामने क्रिकेटपटूंसाठी किती आव्हानात्मक असतील?

स्टेडियममधील चाहत्यांमुळे क्रिकेटपटूंना ऊर्जा मिळते आणि त्यांची कामगिरी बहरते. त्याचा अभाव क्रिकेटपटूंसाठी आता आव्हानात्मक ठरेल. पण सद्य:स्थितीत प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे पर्याय नाही. मी बुंडेसलिगाचे फुटबॉल सामने पाहिले. प्रेक्षकांविनाचे हे सामने नीरस वाटत होते. प्रेक्षकांची छायाचित्रेसुद्धा काही सामन्यांना आभास निर्माण करण्यासाठी स्टेडियममध्ये रचण्यात आली होती. पण या कृत्रिमतेला अर्थ नाही.

* ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अजूनही प्रलंबित ठेवला आहे. या स्पध्रेच्या भवितव्याबाबत तुम्ही काय सांगाल?

ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णय त्यांना लवकरात लवकर घ्यावा लागेल. कारण सहभागी संघांची व्यवस्था आखणे सोपे नाही. प्रत्येक संघातील खेळाडूंपुढे करोनामुक्त आणि सामन्यासाठी तंदुरुस्त राहण्याचेही आव्हान असेल.

* ‘आयसीसी’ने करोनाचे आव्हान पेलत क्रिकेट सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकताना काही नवे नियम लागू केले आहेत. याविषयी तुमचे मत काय आहे?’

आयसीसी’ने हे सर्व नियम करोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते लागू केले आहेत. त्यामुळे करोनामुक्तीनंतर हे नियम रद्द केले जातील.

* मुंबई क्रिकेटचा हंगाम दरवर्षी कांगा स्पध्रेने सुरू होतो. यंदा करोनामुळे उशिराने सुरू होणाऱ्या हंगामाकडे मुंबई क्रिकेटने कसे पाहावे?

गेली सात-आठ वष्रे ऑक्टोबपर्यंत रेंगाळणाऱ्या पावसामुळे कांगा लीगचे बरेचसे सामने रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे कांगा लीगचा उद्देश सार्थकीच ठरत नाही आणि १५ ऑक्टोबरनंतर कांगा लीग खेळवण्यात अर्थ नाही. याबाबत ‘एमसीए’ निर्णय घेईल. पण टाइम्स शील्ड, पोलीस शील्ड यांच्यासारख्या स्थानिक स्पर्धा खेळवता येतील. जेणेकरून १९ आणि २३ वर्षांखाली वयोगट आणि मुंबईच्या रणजी संघाची बांधणी करता येईल. ‘एमसीए’कडे असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील बंदिस्त क्रिकेट अकादमीत क्रिकेटपटूंना पुढील काही महिने सुरक्षितपणे सराव करता येऊ शकतो.

* ‘एमसीए’चे बोधचिन्ह बदलण्याचा प्रस्ताव नुकताच कार्यकारिणीसमोर आला होता. याबाबत तुमचे काय मत आहे?

मुंबई क्रिकेट संघटनेचे बोधचिन्ह हे १९३०पासून अस्तित्वात आहे. मुंबई क्रिकेटच्या परंपरेला साजेसा असे हे लोकप्रिय बोधचिन्ह येथील क्रिकेटपटूंना अभिमानास्पद वाटते. अन्य काही संघटनांनी आपले बोधचिन्ह बदलले, म्हणून आपण का बदलावे? त्यामुळे तो बदलल्यास मुंबई क्रिकेटची शोकांतिका ठरेल. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या हंगामाची काळजी करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबई दौऱ्यावर असताना माझा ‘एमसीए’चा बोधचिन्ह असलेला टाय पाहून भारावले होते. मग मी ‘एमसीए’च्या कार्यालयातून त्यांना टाय भेट म्हणून दिली होती. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता.