टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज प्रवीण कुमारवर त्याच्या शेजाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. इतकच नव्हे तर शेजारी राहणाऱ्या दीपक शर्मा यांच्या सात वर्षांच्या लहान मुलालाही प्रवीणने धक्काबुक्की केल्याचं समजतंय. ANI वृत्तसंस्थेने सर्वप्रथम ही बातमी दिली आहे.

“दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास मी माझ्या मुलाची बसस्टॉपवर वाट पाहत होतो. यादरम्यान प्रवीणकुमार घटनास्थळी आला आणि त्याने बसचालकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर त्याने मलाही शिवीगाळ केली. तो कुठल्यातरी धुंदीत होता. यानंतर त्याने मला मारहाण केली, ज्यात माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. यादरम्यान त्याने माझ्या मुलालाही धक्काबुक्की केली, ज्यामुळे त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. मी याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवीण कुमारचं नाव असल्यामुळे पोलिसांनी मला तक्रार दाखल करण्याऐवजी सामंजस्याने घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर, पोलिसांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. सध्या दीपक शर्मा आणि प्रवीण कुमार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून चौकशीअंतर्गत दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. याआधी २००८ साली मीरतमध्ये रस्त्यात एका डॉक्टरशी प्रवीण कुमारचा वाद झाला होता. यानंतर २०११ साली पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विंडीज दौऱ्यादरम्यान प्रवीणची एका चाहत्याशी बाचाबाची झाली होती.